अहमदपुरात विघ्नहर्ता गणरायाचे जल्लोषात स्वागत
अहमदपूर ( गोविंद काळे ) ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ च्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात अहमदपूर शहर आणि तालुक्यात लाडक्या बाप्पाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यंदाचा गणेशोत्सव नवचैतन्य घेऊन आला असून, घराघरांत तसेच सार्वजनिक ठिकाणी श्रींची प्रतिष्ठापना करून मंगलमय वातावरणात उत्सवाचा प्रारंभ झाला.
गेले काही दिवस बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भाविकांची सकाळपासूनच शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून आली. गणेशमूर्ती, पूजेचे साहित्य, आकर्षक आरास आणि सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठा फुलून गेल्या होत्या. श्रीफळ, हळद-कुंकू, अष्टगंध, हार-फुले, विद्युत रोषणाईच्या माळा तसेच महाप्रसादासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली.
यंदाच्या गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस आणि शाडूच्या मूर्तींना भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला. लालबागचा राजा, शंकर-डमरू तसेच विविध ऐतिहासिक देखाव्यांवर आधारित मूर्ती विशेष आकर्षण ठरल्या. शहरातील विविध गणेश मंडळांनी ढोल-ताशांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात आणि गुलाल उधळणीत बाप्पाची मिरवणूक काढली. या मिरवणुकीत अनेक तरुणांनी डोक्यावर भगवे पट्टे आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ लिहिलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या. अहमदपूर येथील स्वराज्य गणेश मंडळाने मिरवणुकीत समाजोपयोगी संदेश देणारा एक आकर्षक देखावा सादर केला.
संपूर्ण दिवसभर मेन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आझाद चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा बसवेश्वर चौक, थोडगा रोड आणि संभाजीराजे चौक यांसारख्या प्रमुख ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. भाविक कार, टेम्पो, ट्रॅक्टर आणि दुचाकीवरून गणरायाचे स्वागत करत होते. पुढील दहा दिवस धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी असल्याने संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण आहे. गणेश चतुर्थीचा हा वार्षिकोत्सव अहमदपूरवासियांसाठी नेहमीच एक आनंदाची आणि नवचैतन्याची पर्वणी ठरतो.
