अहमदपूर नगरपालिकेला अखेर जाग! पोलीस फ्लॅश न्यूजच्या बातमीचा परिणाम, थोडगा रोडवरील पथदिवे सुरू
पोलीस फ्लॅश न्युज अहमदपूर( गोविंद काळे ) शहराच्या थोडगा रोडवरील बंद पथदिव्यांमुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीवर पोलीस फ्लॅश न्यूजने सातत्याने आवाज उठवल्यानंतर, अखेर अहमदपूर नगरपालिकेला जाग आली आहे. नागरिकांच्या तीव्र संताप आणि गणेशोत्सवादरम्यान संभाव्य धोक्याची शक्यता लक्षात घेऊन, नगरपालिकेने तातडीने कार्यवाही करत थोडगा रोडवरील सर्व पथदिवे पुन्हा सुरू केले आहेत. यामुळे रहिवाशांनी आणि विशेषतः महिला व विद्यार्थिनींनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील या महत्त्वाच्या रस्त्यावरील पथदिवे बंद होते, ज्यामुळे रात्रीच्या वेळी या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली होती. विशेषतः, रस्त्यालगत अनेक कोचिंग क्लासेस असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत विद्यार्थी-विद्यार्थिनींना अंधारातूनच प्रवास करावा लागत होता. या अंधाराचा फायदा घेऊन महिला व मुलींसोबत अनुचित प्रकार घडल्याच्या तक्रारीही समोर आल्या होत्या.
पोलीस फ्लॅश न्यूजने १६ ऑगस्टपासून या गंभीर समस्येवर प्रकाश टाकत, नगरपालिकेच्या निष्क्रिय कारभारावर जोरदार टीका केली होती. गणेशोत्सव तोंडावर आल्याने या समस्येची गांभीर्यता वाढली होती आणि या काळात अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला होता.
या बातमीचा परिणाम म्हणून आणि वाढत्या जनक्षोभामुळे, अखेर अहमदपूर नगरपालिकेने याची दखल घेतली. आज, थोडगा रोडवरील बंद पथदिवे तातडीने दुरुस्त करून पुन्हा चालू करण्यात आले आहेत. यामुळे आता हा संपूर्ण रस्ता प्रकाशमान झाला असून, रात्रीच्या वेळी नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित झाली आहे.
नागरिकांनी पोलीस फ्लॅश न्यूजचे आभार मानले असून, “जनतेचा आवाज बनून प्रशासनाला जाब विचारल्याबद्दल तुमचे अभिनंदन,” अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या घटनेने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, जागरुक पत्रकारिता आणि नागरिकांचा दबाव प्रशासनाला योग्य दिशेने काम करण्यास भाग पाडू शकतो.
