मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ग्रामीण विकासाचा आराखडा – सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील
अहमदपूर ( गोविंद काळे )मुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायत राज अभियान ग्रामीण विकासाचा आराखडा असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर येथे सावता माळी मंगल कार्यालयात ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांच्या वतीने आयोजित ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ च्या अहमदपूर तालुक्याच्या कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा उपजिल्हाधिकारी श्रीमती मंजुषाताई लटपटे मॅडम, गटविकास अधिकारी पंकज शेळके, प्रदेश सरचिटणीस शिवानंद तात्या हेंगणे, महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे सर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जाधव, प्राचार्य पांगरळ महेंद्र, तानाजी राजे, महिला बालविकास अधिकारी राजेश गजलवाड, उपअभियंता पांचाळ, सर्व सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थ, अधिकारी,उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना नामदार पाटील म्हणाले की,या माध्यमातून सुशासनयुक्त पंचायत, ग्रामविकासाची सेवा समग्रता, लोकसहभागावर आधारित विकास, स्वच्छ व हरित ग्राम, मनोरंजन व इतर जीवनोपयोगी सोयी, सक्षम पंचायत वित्तीय स्वावलंबन, तसेच आरोग्य, शिक्षण, सामाजिक बांधिलकी या सर्व घटकांचा संगम साधण्यात येणार आहे.
या अभियानाचा विशेष भाग म्हणजे स्पर्धा व पुरस्कार योजना. राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर स्पर्धा घेऊन उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना कोटी रुपयांच्या निधीने गौरविण्यात येईल. हा सन्मान म्हणजे केवळ आर्थिक मदत नाही, तर गावांच्या प्रगतीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत नामदार पाटील यांनी व्यक्त केले.
