समाज सेवेसाठी संघर्षमय जीवन जगलेला एक ध्येय वेडा शिक्षक गणेश गुळवे सर

0
समाज सेवेसाठी संघर्षमय जीवन जगलेला एक ध्येय वेडा शिक्षक गणेश गुळवे सर

अहमदपूर तालुक्यातील गोताळा येथील ध्येय वेडा व समाजसेवेसाठी जन्मलेला शिक्षक गणेशराव गुळवे गुरुजी
शिक्षकांचे कठोर परिश्रम,समर्पण आणि ज्ञान यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो.भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिना निमित्ताने सबंध भारत देशा मध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो.छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर,साने गुरुजी,कर्मवीर भाऊराव पाटील, यांच्या सारख्या महान विचारांचे पाईक,सूर्या सारखे तेज व स्वच्छ चारित्र्याचे मराठवाड्यातील आदर्श शिक्षक आदरणीय गणेशराव गुळवे गुरुजी हे आहेत.गुरू किंवा शिक्षक ही अशी व्यक्ती असते जी आपल्या भवितव्याचा मार्ग निश्चित करण्यासाठी उपयोगी ठरते.
धरणग्रस्त असलेले धामणगाव ता. शिरूर अनंतपाळ जि.लातूर येथील विशेषतः मुलींच्या शिक्षणाची गैरसोय सदरील शिक्षकाने लक्षात घेवून इ.स.1983 साली संत भगवान बाबा नावाच्या विद्यालयाची स्थापना तेथे केली.या देशातील ज्या ज्या महात्म्यांनी स्त्री शिक्षणासाठी आपले जीवन वेचले तोच मार्ग, तेच ध्येय सदरील शिक्षकाने स्वीकारुन त्या दिशेने टाकलेले हे एक कृतिशील पाऊल आहे.
साने गुरुजी हे हाडाचे एक शिक्षक होवून गेले.जगातला खरा धर्म एकच आहे तो म्हणजे ‘प्रेम’ हा दिव्य संदेश साने गुरुजींनी जगाला दिला. त्याच बरोबर पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिराची दारे अस्पृश्यासाठी त्या काळी बंद होती त्यांनी अमरण उपोषण करुन दलितांच्यासाठी मंदिराची दारे उघडून दिली.केवढी ही तळमळ अस्पृश्याबद्दलची.ही गुरुजींच्या मनातील करुणा.गणेशराव गुळवे यांनी सुद्धा गोरगरीब,दलित पुरुष व महिलांवर होणारा अन्याय दूर व्हावा म्हणून अनेक वेळेस शासन दरबारी महात्मा गांधीजींचा चेला असल्याने अमरण उपोषणेच केली होती.साने गुरुजींना आपले दैवत मानणाऱ्या सदरील शिक्षकाने वरील प्रमाणे कृती करुन साने गुरुजींच्या मार्गावर टाकलेलेच पाऊल आहे असेच मला तरी वाटते.आपल्या देशासाठी, समाजासाठी त्यांनी उदात्त भावनेने समाजकार्य केले आहे.”स्त्रीभ्रूण हत्या” हा एक अविवेकी विचार केवळ भारत देशातीलच नव्हे तर अख्ख्या जगातील सर्व मानव जातीला विनाशाच्या गर्तेकडे नेत असल्याचे सदरील शिक्षकाच्या लक्षात येताच त्यांनी
1) “बेटी बचाओ, बेटी पढाओ”
2) “स्त्री जन्माचा महिमा कळण्या”, जग हे जागवू चला… बांधवानों स्त्रीभ्रूण हत्या टाळा ।। धृ ॥ ही गिते लिहिले आहेत.
सदरील दोन गीतांची परिश्रमपूर्वक रचना केली व स्वतःच त्यांनी गायीली सुद्धा. सदरील गीतांची प्रसिद्धी व प्रशंसा अभूतपूर्व झाली, या देशातील अनेक बुद्धीवंता बरोबर या देशाच्या दोन राष्ट्रपतींनी सुद्धा अगदी मनापासून सदरील गीतांची प्रशंसा केली.ही सर्व समाजहीत जपण्याची तळमळ ती ही काव्यातून व संगीतातून समाज सेवेच्याच दिशेने सदरील शिक्षकाने टाकलेले हे पाऊल नव्हे का?
समाजप्रबोधनपर नाटक “सज्जन पाटलाचे भूत” याचे अनेक प्रयोग महाराष्ट्रातील अनेक शहरा-शहरातून झाले व ते प्रचंड गाजले सुद्धा.हे नाटक सह्याद्री वाहिनीवर अनेक वेळा प्रसारित झाले आहे.
मित्रांनो,ज्यांनी आपल्यासाठी दुःख झेललेलं असेल,त्रास सहन केला असेल,त्याग केला असेल त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे आमचे कर्तव्य,आमचा धर्म असतो. आमच्या पुर्वजांची ही शिकवण आहे.आज तुम्ही आम्ही जी स्वातंत्र्याची फळे चाखतो आहोत, मोठमोठ्या हुद्यावर जाऊन मोठमोठया पगारी उचलतो आहोत, या देशामध्ये मोठ्या निर्भयतेने वावरत आहोत,हे दिवस आम्हाला मिळवुन देणाऱ्यांनी अनंत यातना, अपार कष्ट सोसले आहेत.त्यांनी आपल्या केवळ प्राणाचीच नव्हे तर सर्वस्वाची आहुती दिली आहे. याची आम्ही आठवण ठेवणार आहोत की नाही?हा माझा प्रश्न आपणास आहे?आपण त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणार आहोत की नाही,की कृतघ्नतेच्या बेहोशीत मश्गुल राहणार आहोत. हा आपणा सर्वांना सुजान तरुणांना माझा सवाल आहे?
देशातील न्याय संस्थेवर झगझगीत प्रकाश टाकणारा ‘Black-Justice’ चित्रपट अथवा अण्णा भाऊ साठे सारख्या थोर महात्म्याने गरीब माणसाला न्यायालयाकडून मिळत असलेल्या न्याया बद्दलच्या या सर्वाच्याच कडवट प्रतिक्रिया निवळ जवळपास सारख्याच असून अत्यंत निराशाजनक आहेत आणि त्या बद्दलचा प्रत्यक्ष अनुभव सदरील दुर्दैवी शिक्षकाने स्वतः घेतलेलाच आहे, मात्र काहीही झालेले तरीही सदरील शिक्षकाने त्या गरीबांच्यासाठी केलेल्या धडपडीचे मूल्य मात्र कमी होणार नाही हे निश्चितच.
पण विचार करणाऱ्यास इथे एक वेगळेपण मात्र जाणवेल.वर म्हटल्या प्रमाणे महाभारतातील वीर अभिमन्युच्या अंत समयी त्याच्या डोक्याला लाथ मारल्याच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी रणांगणावर त्याच्या पाठीशी निदान दोन महारथी (अर्जुन,श्रीकृष्ण) उभे होते.वरील न्यायालयीन लढाईत ज्याचा अभिमन्यू झाला त्यावेळी त्या गरीब शिक्षकाच्या पाठीशी कोणीच नव्हते ना अर्जुन, ना सुदर्शनधारी श्रीकृष्ण हे ते वेगळेपण आहे केवढी ती शोकांतिका पण काहींही असो, पुष्कळ वेळा उच्च ध्येय प्राप्तीच्या दिशेने मार्गक्रमण करताना आलेले अपयश सुद्धा विजयापेक्षा कमी नसते हे त्याच्या रोमारोमात भिनलेले आहे. कारण भलेही तो गरीब असला म्हणजे काय झाले तो एक हाडाचा शिक्षक आहे. म्हणून तो असे अपयशव दुःख ही सहजतेने पचवतो.
वरील सर्व व इतर ही अनेक समाजोपयोगी कामे त्यांनी त्याच्या संपूर्ण हयातीत स्वतःला झोकून देऊन केलेली आहेत.परिणाम स्वरुप त्यांच्या या जीवन संघर्षात ते संपले, त्याचे कुटुंब संपले किंबहूना आज त्यांच्यासाठी सर्व कांही संपलेले आहे.आज त्यांचे वय जीवनाच्या पश्चिम क्षितिजावर (वय 80 वर्ष) जाऊन पोहचले आहे.जीवनाच्या अशा संध्या समयी,त्यांना काय कारणाने वृद्धापकाळामुळे,पाणावलेल्या डोळ्यांनी व धूसर झालेल्या नजरेने मागे वळून त्यांचा भूतकाळ पाहण्याची इच्छा होते,कोणास ठाऊक?
महासागरात सुख-दुःखाचे अनेक विचार तरंग उठलेले.त्याला दिसतात क्षीण झालेल्या नजरेने तिकडे पाहात असताना त्याला उगीचच वाटते ज्या गौरवशाली महाराष्ट्रात त्याचा जन्म झाला.त्या महाराष्ट्रातील बुद्धीवंतानी व विचारवंतानी गुळवे नावाच्या या गरीब शिक्षकाने,भूतकाळात समाजसेवेचे जे शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न जो चालवला होता,त्या प्रयत्नाला जर त्यांनी वेळीच त्यांची पण नैतिक जबाबदारी ओळखून केवळ बघ्याची भूमिका न घेता,जर थोडासा त्यांनी हातभार लावला असता,तर आज महाराष्ट्रात एक वेगळेच चित्र पहावयास मिळाले असते.हे मात्र निश्चित,आणि दुसरी त्या पेक्षाही महत्वाची बाब म्हणजे समाजसेवा करणारा,महाराष्ट्रात कधीच वाऱ्यावर सोडला जात नाही,इथला बुद्धीवंत व विचारवंत त्याच्या पाठीशी सह्याद्री बनून खंबीरपणाने उभा राहिले असते तर त्यातून एक अत्यंत महत्वाचा व स्फूर्तीदायक संदेश इथल्या शिवबाच्या मावळ्यांना मिळाला असता.आणि परिणामस्वरूप या महाराष्ट्रातील आमच्या माता भगिनी भय मुक्त होण्यास त्याचा फार मोठा फायदा झाला असता पण नियतीला कदाचित असे मंजूर नसावे.
पुन्हा तो त्या भूतकाळातील कांहीशा वेदनादायी आठवणीतून स्वतःला सावरत त्याच्यासाठी गडद धुक्यासारखे बनत चाललेल्या भविष्याकडे,त्याची क्षीण नजर वळली,त्याला त्यात काय दिसणार होते,फक्त काळोख,पण त्यावेळी त्याच्या मनःचक्षूपुढे मात्र एक तेजस्वी चेहरा व कुठल्या तरी मुलाखतीत व्यक्त केलेले त्यांचे ओजस्वी विचार आठवले.ते असे चांगल कार्य करणाऱ्या माणसाच्या चांगल्या कार्याची ओळख या महाराष्ट्राला होते पण त्याच्या मरणानंतर!जीवंतपणी ज्यांची ओळख येडा तुक्या म्हणून होत होती,त्यांच्या मृत्यूनंतर आज मात्र त्यांची ओळख जगतगुरु तुकाराम महाराज म्हणून होते आहे.हे एक उत्तम उदाहरण नव्हे का.वरील प्रमाणे वास्तववादी विचार व्यक्त करणाऱ्या त्या महान व्यक्तीचे नांव आहे ‘सिंधूताई सपकाळ’ ज्यांना केवळ आणि केवळ ‘अनाथांची माय’ या अलौकिक नावाने सर्व जग ओळखते, अशी ही माय आमच्या महाराष्ट्रात जन्माला आली व माय म्हणजे अबला नव्हे तर ती किती सामर्थ्यशाली असू शकते हे स्वतःच्या आचरणातून एक दिव्य संदेश अखिल मानव जातीला आणि विशेष करुन नारी जातीला देऊन गेली.अर्थात ही बाब महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. शेवटी त्या अनाथांच्या माईच्या विचाराने त्या शिक्षकाला खुप समाधान वाटले असावे असे त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानाने वाटले असे मला तरी वाटते..
सुख पाहता जवापाडे। दुःख पर्वताएवढे ।।
असे सांगणाऱ्या तुकोबारायांनी आपल्या जीवनात दुर्दैवाचे दशावतार अनुभवले तरीही ‘पिटू भक्तीचा डांगोरा। कळी काळासी दरारा।’ असे म्हणत त्या संकटावर ते स्वार झाले.आयुष्यभर उपहास, उपेक्षा,येऊनही संत ज्ञानदेवांनी खळांची व्यंकटी सांडण्यासाठी आणि दुरितांचे तिमिर जाण्यासाठी सकारात्मक भावनेने ‘जो जे वांछिल। तो ते लाहो।’ अशी प्रार्थना करीत पसायदान मागितले. निराशेतून आशेचा किरण शोधत, नकारात्मकतेला सकारात्मकतेत रूपांतरित करत या संतांनी आणि थोर माणसांनी आपले जीवनमंदिर अधिक देखणे केले.ज्या शिक्षण व्यवस्थेतून एक जबाबदार नागरिकांची निर्मिती होते त्या व्यवस्थेवर गणेशराव गुळवे गुरुजींनी लक्ष केंद्रित केले.देशाची प्रगती साधायची असेल तर त्या प्रगतीचा आत्मा म्हणजे शिक्षकवृंद असतो अशा महान विचारांच्या आदर्श शिक्षकांच्या विचारातून शिक्षणाची आस्था.स्पष्ट होते.
त्यांच्या जीवनमंदिराच्या कळसाचे दर्शनही आपल्याला प्रेरणा देते.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षकांचे योगदान अमूल्य असते. शिक्षक म्हणजे केवळ शाळा-महाविद्यालयातील शिक्षकच नव्हेत,तर जी व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवून जाते, ती आपली शिक्षकच असते. अशा सर्व शिक्षकांचे आभार मानण्याचा हा दिवस.
अवतीभोवतीच्या परिसरामध्ये सामाजिक चीड निर्माण होण्याचा प्रसंग असेल तर त्या ठिकाणी गांधीजींच्या अहिंसात्मक मार्गाचा अवलंब करून घेऊन अशा समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, ही संपूर्ण पंचक्रोशीत माहित आहे. परंतु नाही म्हटलं तरी इतिहास साक्षी आहे ज्यांनी समाजासाठी आपलं योगदान दिलंय त्यांच्या संसाराचं वाटोळं झालं आहे हे कुठेतरी आदरणीय गुळवे गुरुजींच्या डोक्यामध्ये पक्के बसले असावे म्हणून त्यांनी कुठेही आपल्या कुटुंबाचे वाटोळं झाल्याची खंत व्यक्त केली नाही.
म्हणून,एकंदरीत आदरणीय गणेश राव गुळवे गुरुजींचे जीवन चरित्र जर पाहिले तर त्यांनी जे काही समाजासाठी केले त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे‌.
शिक्षक दिननिमित्त सर्व शिक्षक गुरुजनांचे हार्दिक अभिनंदन तुम्हाला पुढील आयुष्य सुख समृद्धी, समाधान आणि यशाने भरलेले जावो हीच सदिच्छा.

-महेश वामनराव पाटील
मो. 8055915151

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!