यशवंत विद्यालयात राष्ट्रीय शिक्षक दिन उत्साहात साजरा
अहमदपूर ( गोविंद काळे): अहमदपूर येथील यशवंत विद्यालयात राष्ट्रीय शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच शिक्षणाच्या महत्त्वावरही भर देण्यात आला.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी, हा दिवस केवळ शिक्षकांचे आभार मानण्याचा नाही, तर आपल्याला ज्ञानाच्या मार्गावर घेऊन जाणाऱ्या आणि शहाणपण शिकवणाऱ्या शिक्षकांचे महत्त्व समजून घेण्यासाठी आहे, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एस. एस. एम. प्रतिष्ठानचे अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुगळे उपस्थित होते. त्यांनी ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक शिवाजी सूर्यवंशी, क्रीडा शिक्षक संतोष कदम, कलाशिक्षक महादेव खळुरे, संस्थेचे मुख्य लिपिक राजेंद्र सूर्यवंशी, तसेच संतोष पाटील आणि सुनील कुमरे यांनी विशेष परिश्रम घेतले. मुख्याध्यापकांनी उपस्थित सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि सर्व शिक्षकांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
