भक्ती स्थळाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील
अहमदपूर ( गोविंद काळे ) येथील भक्ती स्थळ हे सर्व भक्तांचे शक्ती स्थळ असून, या स्थळाच्या विकासासाठी शासनाकडून भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि निधीची कमतरता कधीही पडू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी केले.
राष्ट्रसंत परमपूज्य डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर युवा संत राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज, धारेश्वरकर महाराज, शंकरलिंग शिवाचार्य महाराज, संगमेश्वर महाराज, शिवा संघटनेचे मनोहरराव धोंडे सर, आणि अनेक मान्यवर तसेच मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.
नामदार पाटील पुढे म्हणाले की, राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज केवळ एका तालुक्याचे किंवा जिल्ह्याचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे भूषण होते. त्यांनी नेहमीच समाज परिवर्तन आणि प्रबोधनासाठी काम केले. ते म्हणाले की, राज्याचा सहकार मंत्री म्हणून काम करण्याची संधी त्यांना राष्ट्रसंतांच्या आशीर्वादामुळे मिळाली.
यावेळी त्यांनी असेही सांगितले की, भक्ती स्थळाच्या विकासासाठी ते कायम सोबत राहतील आणि हे स्थळ एक आदर्श भक्ती स्थळ बनेल यासाठी ते स्वतः प्रयत्न करतील. मंदिराच्या भूमिपूजनासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
