अहमदपुरात पाचवा संजीवन समाधी सोहळा उत्साहात, भक्ती स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध – सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील

0
अहमदपुरात पाचवा संजीवन समाधी सोहळा उत्साहात, भक्ती स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध - सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील

​अहमदपूर ( गोविंद काळे): महाराष्ट्र ही संतांची भूमी असून, राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे जीवन आणि कार्य समाजाला प्रेरणा देणारे आहे. त्यांनी जीवनभर स्वतःसाठी काहीही न करता, स्वातंत्र्यलढ्यात आणि समाज परिवर्तनासाठी निस्वार्थपणे काम केले. त्यामुळे आगामी काळात या भक्ती स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी मी वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी केले.
​ते येथील भक्ती स्थळावर आयोजित पाचव्या संजीवन समाधी सोहळ्याच्या वेळी बोलत होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी वीरमठ संस्थांचे मठाधिपती युवा संत प.पू. राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज होते. यावेळी व्यासपीठावर शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे, प.पू. निळकंठ शिवाचार्य महाराज धारेश्वरकर, प.पू. शंकरलिंग शिवाचार्य महाराज शिरूर अनंतपाळकर, प.पू. शिवलिंग शिवाचार्य महाराज उजनेकर, तसेच इतर अनेक संत, स्थानिक नेते आणि मान्यवर उपस्थित होते.
​भक्ती स्थळाला आदर्श स्वरूप देण्याचा निर्धार
​सहकार मंत्री पाटील पुढे म्हणाले की, राष्ट्रसंतांनी जीवनभर राष्ट्राला जोडण्याचे काम केले. मी नास्तिक नसून श्रद्धाळू आहे. तिरुपती बालाजी मंदिराप्रमाणेच महाराजांच्या मंदिराचे काम झाले पाहिजे, आणि महाराजांच्या नावाला शोभेल असे आदर्श भक्ती स्थळ येत्या काळात तयार होईल, असे त्यांनी सांगितले.
​धर्माचे केंद्र जपण्याचे आवाहन
​शिवा संघटनेचे संस्थापक प्रा. मनोहर धोंडे यांनी यावेळी बोलताना महाराष्ट्रातील बहुजन समाजासाठी दोन महत्त्वाची धर्म केंद्रे आहेत, एक बीड जिल्ह्यातील कपिलधार आणि दुसरे अहमदपूर येथील राष्ट्रसंतांचे भक्ती स्थळ. ही दोन्ही केंद्र जपण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे मराठा समाजाप्रमाणे लिंगायत समाजालाही ओबीसीमध्ये समावेश करण्याची मागणी केली.
​समाधी मंदिराचे भूमिपूजन २५ फेब्रुवारी २०२६ रोजी
​या सोहळ्यात बोलताना प्रा. मनोहर धोंडे यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. राष्ट्रसंतांच्या समाधी मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा २५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
​भक्तांची मांदियाळी आणि दर्शनासाठी गर्दी
​संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने वाळकेवाडी, दगडगाव, खेडकरवाडी, मंगनाळी, नळेगाव, पांढरवाडीसह १७ गावांहून भाविक भक्तांनी मोठ्या उत्साहात दिंड्या घेऊन शिवनामाचा गजर करत भक्ती स्थळावर हजेरी लावली. राष्ट्रसंतांच्या मूळ समाधीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशसह हजारो भक्तांनी मोठी गर्दी केली होती.
​कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रेय खंकरे यांनी केले, तर सूत्रसंचालन राम तत्तापुरे आणि आशा रोडगे तत्तापुरे यांनी केले. शेवटी ॲडव्होकेट धन्यकुमार शिवणकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवलिंग पाटील, पद्मिनीताई खराडे, उमा हामणे, संजय उस्तुर्गे, आणि इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!