कांदा उत्पादन वाढवून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी केंद्राची स्थापना – नाना आहेर
उदगीर (एल पी उगीले)
लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कांदा उत्पादनातून स्थिर उत्पन्न मिळावे व त्यांचे आर्थिक जीवनमान उंचवावे, या उद्देशाने उदगीर येथे नाफेडचे कांदा खरेदी केंद्र सुरू होत आहे. ही माहिती नाफेड संचालक केदा तानाजी आहेर (नाना) यांनी स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर सहकारी खरेदी विक्री संघाच्या वतीने आयोजित “कांदा उत्पादक संवाद मेळाव्यात” दिली.
“कांदा उत्पादन हे शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचे सक्षम साधन ठरू शकते. शेतकऱ्यांनी ऊस व सोयाबीन या पारंपरिक पिकांसोबत कांद्याचे उत्पादन वाढवले पाहिजे. नाफेडमार्फत कांदा थेट आधारभूत किमतीवर खरेदी केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होणार नाही, व दलालांच्या त्रासातून दिलासा मिळेल,” असे नाना आहेर म्हणाले.
“सहकाराचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती” – भगवानराव पाटील तळेगावकर
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भगवानराव पाटील तळेगावकर होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की, “स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर खरेदी विक्री संघ ही मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी गेली तब्बल ५१ वर्षे कार्यरत असलेली एकमेव संस्था आहे. केवळ खरेदी-विक्रीपुरते मर्यादित न राहता, ही संस्था सभासद शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्य करते.वेगवेगळे परिसंवाद, कार्यशाळा, संवाद मेळावे आयोजित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन देणे, तसेच वेळप्रसंगी आर्थिक मदत करणे हे आमचे ध्येय आहे. अशा उपक्रमांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणणे शक्य होते आणि हाच खरा सहकाराचा मुख्य उद्देश आहे.”
नाफेडचे हे कांदा खरेदी केंद्र उभारल्याने उदगीर व परिसरातील शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ, थेट हमीभाव व आर्थिक उन्नतीची नवी दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
या संवाद मेळाव्यात व्यासपीठावर
केदा तानाजी आहेर,भगवानराव पाटील तळेगावकर,डॉ. आनंद सोळुंके
प्रवीण मेधने,किशोर महाले,ॲड. अविनाश ईरपतगिरे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरतभाऊ चामले, प्राचार्य ए.पी. सूर्यवंशी,सदाशिव पाटील तळेगावकर याशिवाय खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष शंकरराव पाटील तळेगावकर यांच्या सह सर्व संचालक मंडळ, स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर सहकारी खरेदी विक्री संघ, तसेच उदगीर, जळकोट व देवणी तालुक्यातील चेअरमन आणि शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेकापूरचे चेअरमन बाळासाहेब नावडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन बाबासाहेब काळे यांनी केले.
