राष्ट्रीय महामार्ग 361 वर सीसीटीव्ही कॅमेरे बंद; महसूल आणि पोलिसांसमोर अपघाताचा तपास आणि वाळू तस्करी रोखण्याचे आव्हान
अहमदपूर( गोविंद काळे ) राष्ट्रीय महामार्ग 361 वरील अहमदपूर शहरातून सुरू होणाऱ्या बायपास ते माळेगाव टोलपर्यंत बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचा तपास लावण्यात पोलिसांना मोठी अडचण येत असून, अपघातग्रस्त कुटुंबांना न्याय मिळण्यास विलंब होत आहे. यामुळे, हे कॅमेरे केवळ शोभेसाठी बसवले आहेत का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
वाळू माफियांना मोकळे रान
याच रस्त्याचा फायदा घेत वाळू माफिया रात्रीच्या वेळी अवैधरित्या वाळूची वाहतूक करत असल्याचे समोर आले आहे. ही वाळू अहमदपूर शहरात सर्रास विकली जाते. महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे या गैरप्रकाराला अधिकच बळ मिळत असून, नागरिकांमध्ये याबद्दल उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
प्रशासनावर प्रश्नचिन्ह
जर हे सीसीटीव्ही कॅमेरे सुरू झाले, तर दररोज हजारो ब्रास वाळू चोरी करणाऱ्या हायवा गाड्या त्यात कैद होतील. यामुळे प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याची वेळ आली आहे, असे नागरिक बोलत आहेत. शासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन बंद असलेले कॅमेरे तात्काळ सुरू करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यामुळे अपघातग्रस्तांना न्याय मिळण्यासोबतच अवैध वाळू वाहतुकीलाही आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
