बुद्धगया महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्या! – जनसंवाद व धम्मध्वज रॅलीत हजारोंची उपस्थिती
अहमदपूर, ( गोविंद काळे): बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी भंते विनाचार्य (बिहार) यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या जनसंवाद आणि धम्मध्वज पदयात्रेत आज अहमदपुरात हजारो बौद्ध उपासक, उपासिका आणि युवकांनी भर पावसातही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
‘बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलना’च्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा जनसंवाद कार्यक्रम सध्या महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात सुरू आहे. याच अनुषंगाने आज ही पदयात्रा शहरात दाखल झाली होती. महात्मा गांधी महाविद्यालयापासून सुरू झालेली ही पदयात्रा शहरातील मुख्य मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज चौक, आझाद चौक, भीम नगर, हिना लॉज – बौद्ध नगर मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापाशी पोहोचली, जिथे तिचा समारोप झाला.
या पदयात्रेचे विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले. महात्मा गांधी महाविद्यालयासमोर व्हीएस पॅंथरचे विनोदभाऊ खटके, पॅंथर संजयभाऊ कांबळे, जिल्हाध्यक्ष शरद किनीकर, मुख्य संयोजक डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष शरद सोनकांबळे, शहराध्यक्ष बजरंग गायकवाड, शरद कांबळे, भगवानराव ससाणे, माजी नगराध्यक्ष सरस्वतीबाई कांबळे, रिपाई नेते अरुणभाऊ वाघंबर, डॉ. बालाजी थिट्टे, सरपंच राजूभाऊ यांच्यासह अनेकांनी उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. माजी मंत्री बाळासाहेब जाधव, शहराध्यक्ष अॅड. अमित भैया रेड्डी, सांब महाजन, सरपंच लक्ष्मण खंदाडे यांनीही भंतेजींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शहरात ठिकठिकाणी या रॅलीवर पुष्पवृष्टी करण्यात येत होती.
प्रचंड पाऊस असूनही, बौद्ध उपासक, उपासिका, युवक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने धम्मध्वज खांद्यावर घेऊन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने चालत होते. भंते पैयायनंद थेरो यांनी त्रिसरण पंचशील दिले, तर भारतीय बौद्ध महासभा भिक्खू संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महाविरो थेरो यांनी या आंदोलनास समस्त बौद्धांनी सक्रिय पाठिंबा देऊन आपल्या न्याय हक्कांसाठी सहभागी होण्याचे आवाहन केले.
बिहारहून आलेले भंते विनाचार्य यांनी आपल्या मनोगतात सरकारला प्रश्न केला की, “या देशात प्रत्येक धर्मीयांचे धर्मस्थान त्या त्या धर्मीयांच्या हातात असताना, बुद्धगया येथील महाविहार हे बौद्धांच्या हातात का देऊ नये?” या संदर्भात १२ फेब्रुवारी २०२६ रोजी दिल्ली येथे बौद्धांच्या आणि समाजाच्या वतीने भव्य आंदोलन पुकारण्यात येणार असून, त्यात लाखो संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
या रॅलीमध्ये भंते महाविरो थारो, भंते पय्यानंद थेरो, भंते धम्मघोष थेरो, भंते बोधीधम्म (नांदेड), भंते शाक्यपुत्र, भंते राहूल यांच्यासह अनेक भिक्खू सहभागी झाले होते. महिला उपासिका, उपासक आणि युवक वर्गाचा उत्साह अवर्णनीय होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गायकवाड आणि सुभाष साबळे यांनी केले, तर आभार आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते गोपीनाथराव जोंधळे यांनी मानले. या रॅलीच्या आयोजनात सचिन बानाटे, प्रभाष कसादे, शेषराव ससाणे, संतोष गायकवाड, सम्राट मित्र मंडळाचे अध्यक्ष शरद सोनकांबळे, आकाश सांगवीकर, हरिश्चंद्र वाघमारे, पत्रकार भीमराव कांबळे, विजय वाघमारे, माधव तिगोटे, गौतम सोनकांबळे, प्रा. डी. बी. शिंदे, पांडुरंग धर्माधिकारी, विलास चापोलीकर, अण्णाराव सूर्यवंशी, नितीन सरकाले, बालाजी दुधाने, आदित्य गुळवे, पत्रकार अजय भालेराव, शरद बनसोडे, शिवाजी गायकवाड, मारुती परतवाघ, सखाहरी परतवाघ, व्यंकट वाघमारे, किरण कांबळे, रत्नदीप परचंडेकर, चंद्रकांत कांबळे, विकास ससाने, मिलिंद कदम, संविधान कदम, रितेश रायभोळे, रोहन ससाने, विकास ससाने आदींनी सक्रिय सहभाग घेतला.
