हाडोळतीत ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; २३ किलो चांदी लंपास
अहमदपूर, ( गोविंद काळे) – अहमदपूर तालुक्यातील हाडोळती गावात चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन सराफा दुकाने फोडून तब्बल २३ किलो चांदी आणि १८ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करत आहेत.
शिवाजी चौकाजवळील मेन रोडवरील ‘अमित ज्वेलर्स’ आणि ‘विठ्ठल ज्वेलर्स’ या दोन दुकानांना चोरट्यांनी लक्ष्य केले. कटरच्या सहाय्याने दुकानांचे शटर व कुलूप तोडून आत प्रवेश करत, चोरट्यांनी २३ किलो चांदी आणि १८ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. या दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते, मात्र चोरट्यांनी केमिकलचा वापर करून ते निष्क्रिय केल्याचे समोर आले आहे. यामुळे हे चोरटे सराईत असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपास करण्यासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते, परंतु त्यांना चोरट्यांचा माग काढण्यात यश आले नाही. अमित कापसे आणि महेश पवार यांच्या तक्रारीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी ही चोरी झाली, तिथून फक्त १०० फुटांवर हाडोळतीची पोलीस चौकी आहे, परंतु तिथे पोलीस कर्मचारी राहत नसल्यामुळे अशी गुन्हेगारी वाढत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक करत आहेत. नागरिकांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
