सांस्कृतिक ऐक्य जोपासणे हेच मराठवाड्याच्या विकासास मारक – डॉ. संतोष मुळे
उदगीर (प्रतिनिधी): मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्राचार्य डॉ. आर. के. मस्के आणि उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महाविद्यालयाच्या वतीने ‘स्कुल कनेक्ट’ उपक्रमांतर्गत स्वातंत्र्य दिनानिमित्त तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण या प्रसंगी संपन्न झाले. शालेय गटासाठी अनुक्रमे प्रथम पाच हजार, द्वितीय तीन हजार आणि तृतीय दोन हजार अशी बक्षिसे देण्यात आली. यामध्ये नरसिंह विद्यालय, गुरदाळ येथील सोनकांबळे आदित्य बालाजी याला प्रथम, ब्राईट स्टार हायस्कूल, उदगीर येथील घोणसीकर कृष्णा दत्तात्रय याला द्वितीय तर श्यामलाल मेमोरियल हायस्कूल, उदगीर येथील सगर गायत्री संतोष याला तृतीय क्रमांक मिळाला. टाईम्स पब्लिक स्कूल, नेहरू मेमोरियल हायस्कूल, शिवाजी महाविद्यालय, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, लालबहादूर शास्त्री विद्यालय व ब्राईट स्टार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. पदवी व पदव्युत्तर गटात महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथील कवठाळे श्रुती बापूराव हिला प्रथम, दुग्धतंत्रज्ञान महाविद्यालय, उदगीर येथील आहेर आरती सत्यवान हिला द्वितीय तर महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथील मठचे वैष्णवी ज्योतलिंग हिला तृतीय क्रमांक मिळाला. छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालय, श्री हावगीस्वामी महाविद्यालय, दुग्धतंत्रज्ञान महाविद्यालय व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. या वेळी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, स्पर्धा समन्वयक प्रा. डॉ. गौरव जेवळीकर, प्रा. प्रवीण जाहुरे, परीक्षक धनंजय गुडसुरकर व रामदास केदार उपस्थित होते. यावेळी दिनविशेष समितीच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ व प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करण्यात आले. मराठवाडा गौरव गीताचे गायन प्रा. अश्विन वळवी यांनी केले. प्रमुख व्याख्यानात अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. संतोष मुळे यांनी “मराठवाड्याने मुक्ती संग्रामानंतर काय मिळवले” या विषयावर विचार मांडले. त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यवीरांच्या योगदानावर प्रकाश टाकत भाषेच्या आधारावर मराठवाडा व विदर्भ महाराष्ट्रात सामील झाल्याचे सांगितले. वैधानिक विकास महामंडळाची भूमिका, तसेच निजाम आणि महाराष्ट्र शासन दोन्हींच्या दुर्लक्षामुळे या भागाचा विकास राज्याच्या तुलनेत कमी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सांस्कृतिक व भाषिक संबंध जोपासण्यासाठी मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाला; परंतु “सांस्कृतिक ऐक्य जोपासणे हेच मराठवाड्याच्या विकासास मारक ठरले” असे त्यांनी अधोरेखित केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांनी मुक्तीसंग्राम दिनाच्या आणि निबंध स्पर्धेतील विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. ए. पी. मोरे यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. प्रसाद जालनापुरकर यांनी केले आणि आभार प्रदर्शन प्रा. डॉ. एस. जी. अन्सारी यांनी केले.
