डॉ. विजय जाधव यांना विद्यापीठाचा युवा संशोधक पुरस्कार
उदगीर (प्रतिनिधी) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी संशोधन क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या युवा प्राध्यापकास ‘युवा संशोधक शिक्षक पुरस्कार’ दिला जातो. यावर्षी छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालय उदगीर येथील भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजय जाधव यांना विद्यापीठाचा युवा संशोधक पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण मान्यवराच्या हस्ते 19 सप्टेंबर रोजी विद्यापीठात होणार आहे.
डॉ. जाधव यांच्या संशोधन कार्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापक स्वरूपात मान्यता प्राप्त झालेली आहे. 2023-24 मध्ये त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठ, इंग्लंड येथे व्हिजिटिंग सायंटिस्ट म्हणून कार्य केले आहे. 2021 ते 25 या कालावधीत त्यांचा वर्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये समावेश झालेला आहे. 2021 मध्ये त्यांना ब्रिक्स यंग सायंटिस्ट ही अत्यंत मानाची समजली जाणारी फेलोशिपही मिळालेली आहे. चीन सरकारचा सर्वोत्कृष्ट संशोधक पुरस्कारही त्यांना 2022 मध्ये प्राप्त झाला आहे. त्यांनी 2019 मध्ये आयर्लंड देशाचे लिंडाऊ नोबेल लॉरेट मीटिंगमध्ये युवा शास्त्रज्ञ म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. 2015 मध्ये भारत सरकार द्वारा युवा शास्त्रज्ञ म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. 2014-15 मध्ये भारत व कोरियन देशाच्या सामंजस्य करारांतर्गत त्यांनी साऊथ कोरिया या देशात संशोधन कार्य केले आहे. 2018 मध्ये त्यांना आयर्लंड सरकारच्या वतीने मानाची फेलोशिप देण्यात आलेली होती. तसेच युरोपियन कमिशन द्वारे त्यांच्या मेरी क्युरी प्रस्तावाला उत्कृष्ट दर्जा देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर, सचिव पी टी शिंदे, कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एम. मांजरे, सिनेट सदस्य डॉ. व्ही. एम. पवार, प्रबंधक श्री बी. के. पाटील, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व मित्र परिवाराच्या वतीने अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
