अनाथांचा नाथ श्री राधाकृष्ण फाउंडेशनचे “आकाश साळुंखे “

0
अनाथांचा नाथ श्री राधाकृष्ण फाउंडेशनचे "आकाश साळुंखे "

निलंगा (प्रतिनिधी) कलियुगात आप्तस्वकीयांना देखील अर्थकारणाच्या निमित्ताने कित्येक जण दूर ढकलतात, इतकेच काय वृद्धाश्रमाची वाढती संख्या ही एक चिंतेची बाब झाल्याची सर्वच बोलतात. मात्र आपले आई-वडील पोसायला आपली मुले का तयार होत नाहीत? याचे आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. एका बाजूलाही इतकी भयानक परिस्थिती असताना, निलंगा येथील श्री राधाकृष्ण फाउंडेशनच्या निमित्ताने आकाश साळुंखे या ध्येयवेडा तरुणाने 65 बेवारस लोकांना आधार देऊन त्यांचा सांभाळ करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात आणि महाराष्ट्रातील अनेक निराधार यांना राधाकृष्ण फाउंडेशन मदतीचा हात देत आहे. जे निराधार आहेत, किंवा मतिमंद आहेत, जे बेवारस आहेत अशांना या फाउंडेशनच्या मदतीने अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागवत असतानाच अगदी एखाद्या लहान लेकराला जसे सांभाळावे, त्या पद्धतीने त्यांना अगदी मूखमार्जनापासून, स्नान घालण्यापर्यंतचे काम या फाउंडेशनच्या वतीने आकाश साळुंखे यांनी हाती घेतले आहे. तब्बल 65 लोकांना जनतेच्या मदतीनेच सांभाळण्याचा जीम्मा त्यांनी उचलला आहे. कोणतीही शासकीय मदत अद्याप तरी त्यांना प्राप्त झाली नाही, आणि विशेष म्हणजे या बेवारस लोकांच्या आनंदात भर टाकण्यासाठी वेळोवेळी त्यांचे वाढदिवस साजरे करणे, त्यांच्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करणे, समाजातील इतर दानशूर व्यक्तीच्या मदतीने मिष्ठान्न भोज ठेवणे, अशा कार्यक्रमाचेही आयोजन करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे काम हा ध्येयवेडा तरुण करतो आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी त्याने दहा लाखाचे कर्ज घेऊन हा प्रकल्प सुरू केला. त्याला त्याच्या वडिलांनीही पाठिंबा दिला. त्यामुळे मनोरुग्ण व बेवारस यांना राहण्यासाठी कुठलाही आधार नाही, अशांना सांभाळ करण्याची व्यवस्था या तरुणांनी केली आहे. जे बेवारस आहेत किंवा जे मतिमंद आहेत, त्यांच्या आप्तस्वयक यांचा शोध घेण्याचे आणि त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचता करण्याचे अग्निदिव्य देखील आकाश सोळुंके आपल्या फाउंडेशनच्या मदतीने करत आहेत. त्यांचे हे कार्य खरोखरच अनाथांचा नाथ म्हणण्यासारखेच आहे.
मनोरुग्ण असतील, अंध अपंग असतील तर त्यांची सर्व सोय करून त्यांना मातृत्वाची उब देण्याचे काम या फाउंडेशनच्या माध्यमातून केले जात आहे. समाजातील दानशूर व्यक्तींना या अनुषंगाने विनंती केली जाते आणि त्या लोकांच्या मदतीवर किंवा स्वबळावर राधाकृष्ण फाउंडेशन हे समाजकार्य करत आहे. 25 ऑगस्ट 2023 रोजी श्री राधाकृष्ण फाउंडेशन ची स्थापना केली. या फाउंडेशन अंतर्गत त्यांनी बेघर, बेवारसांची निवास व्यवस्था करून त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागवायला सुरुवात केली आहे. या समाज सेवेला हातभार लावावा म्हणून डॉ. प्रवीण वारद आणि डॉ. अरविंद भातंबरे हे दोघेही प्रकल्पात येऊन प्रकल्पातील बेवारस लोकांची आरोग्याची तपासणी करतात. त्यांना मोफत उपचार करतात. तसेच इतरही अनेक लोक वेळप्रसंगी आपला वाढदिवस असेल किंवा विवाहाचा वाढदिवस असेल त्या दिवशी या बेवारस लोकांच्या सोबत गोडधोड खाऊ देऊन आनंद साजरा करतात.
आकाश साळुंखे यांच्या या प्रकल्पाला राज्य अन्न आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई चे अध्यक्ष महेश ढवळे यांनी भेट देऊन आयोगाच्या मार्फत जीजी म्हणून मदत करता येईल, ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच निलंगाचे तहसीलदार यांनी देखील या समाजकार्यासाठी आपण मोठा वाटा उचलण्यास सज्ज असल्याचे जाहीर केले आहे. अशा सामाजिक जाणीव जपणाऱ्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्यास निश्चितपणे राधा कृष्णा फाउंडेशन दुप्पट जोमाने कामाला लागेल, आणि समाजातील उपेक्षितांना खऱ्या अर्थाने न्याय मिळू शकेल. अशी चर्चा आता चालू आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!