जागतिक संपर्काचे माध्यम म्हणजे इंग्रजी भाषा : डॉ. शुजाउद्दीन छप्परबन
उदगीर (प्रतिनिधी) मानवी जीवनात भाषेला अनन्यसाधारण महत्त्व असून, भाषेमुळेच माणसाने नेत्रदीपक यश मिळविले आहे. आज इंग्रजीसारख्या आंतरराष्ट्रीय भाषेमुळे जग जवळ आले असून, जागतिक पातळीवर संपर्काचे माध्यम म्हणजे इंग्रजी भाषा होय, असे प्रतिपादन सेंट्रल युनिव्हर्सीटी ऑफ गुजरात केंद्रीय विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. शुजाउद्दीन छप्परबन यांनी केले.
येथील छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या इंग्लिश लिटररी असोसिएशन व ‘कम्यूनिकेटिव्ह इंग्लिश’ या सर्टीफिकीट कोर्सच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रामकिशन मांजरे हे होते, तर विचारपिठावर इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. अरविंद नवले , डॉ.आतिश आकडे , डॉ. प्रशांत माने , प्रा.ज्योती पाटील , प्रा. चंद्रशेखर मलकमपट्टे , प्रा. सुशिल साळुंके व प्रा. ज्ञानेश्वर घोगरे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘होराईजन’ या भित्तिपत्रकाचे प्रकाशनही पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. रामकिशन मांजरे म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्यांने आवर्जून इंग्रजी भाषेत संभाषण करण्याचे कौशल्य अवगत करावे. इंग्रजी ही आज ज्ञानाबरोबरच व्यवहाराचीही भाषा बनली असून, व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेचा वापर करावा, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. अरविंद नवले यांनी म्हटले,आधुनिक व डिजीटल युगात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे संभाषण कौशल्य अवगत असणे ही काळाची गरज आहे. हे ओळखून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ‘कम्यूनिकेटीव्ह इंग्लीश’ या सर्टीफीकीट कोर्सची सुरुवात इंग्रजी विभागाने केली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. स्वरांजली यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. प्रशांत माने यांनी मानले. या प्रसंगी इंग्लिश लिटररी असोशिएशन’चे पदाधिकारी, ‘ होराईजन’ या भित्तीपत्रकाचे संपादक मंडळ,इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी व कार्यालयीन कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
