संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालयात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी संपन्न – आरोग्य जागरूकतेचा उपक्रम
उदगीर (प्रतिनिधी) संत ज्ञानेश्वर माऊली प्रा.विदयालय,उदगीर या शाळेत धन्वंतरी आयुर्वेदिक कॉलेज यांच्या वतीने विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या उपक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापन व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. प्राथमिक ते माध्यमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी या तपासणीमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
तपासणीसाठी आलेल्या आरोग्य पथकात डॉ. शिवकुमार मरतुले, प्रसिद्ध बालरोग तज्ञ, डॉ. शिवप्रताप बिरादार प्रसिद्ध बालरोग तज्ञ व चिकित्सक तसेच प्रशिक्षणार्थी विद्यार्थी डॉ. आगदे स्वरांजली, डॉ. थोरमाने ऋतुजा, डॉ. माने रोहिणी, डॉ. सुडे अमूल्या, डॉ. गौरव कवाणे यांच्यासह परिचारिका व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे वजन, उंची, रक्तदाब, दृष्टी, दात, कान, त्वचा तसेच सर्वसाधारण आरोग्याची तपासणी करण्यात आली. काही विद्यार्थ्यांची आवश्यकतेनुसार पुढील तपासणीसाठी नोंद करण्यात आली.
यावेळी डॉक्टरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना संतुलित आहाराचे महत्त्व, दूध, फळे व हिरव्या भाज्यांचा समावेश असलेला आहार घ्यावा, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच शारीरिक स्वच्छता, नियमित व्यायाम, खेळाचे महत्त्व, झोपेचे नियम याविषयीही सविस्तर माहिती दिली.
विद्यार्थ्यांना दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या लहानसहान आजारांवर प्राथमिक उपचार कसे करावेत ?, लसीकरणाचे महत्त्व काय आहे? याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. काही विद्यार्थ्यांना मोफत औषधोपचार ही देण्यात आले. मुख्याध्यापिका श्रीमती अनिता जगताप यांनी आरोग्य तपासणी उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “शालेय वयातील मुलांचे आरोग्य सक्षम असणे हीच खरी गुंतवणूक आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याची जाण वाढते.” पालकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.एस. बिरादार सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती उषाकीरण खुळे यांनी मानले.
आरोग्य तपासणीच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण झाली असून हा कार्यक्रम यशस्वी ठरला.
