अहमदपूरमध्ये शिक्षकांचा सन्मान सोहळा; शिक्षकांनी आत्मसमर्पण करावे – दत्तात्रय वारे गुरुजी
अहमदपूर ( गोविंद काळे): शिक्षकांनी शिक्षणासाठी पूर्णपणे समर्पित होऊन काम केले पाहिजे. शिक्षक हे केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर त्यांच्या आत्म्याला आणि चारित्र्याला घडवण्याचे महत्त्वाचे काम करतात, असे प्रतिपादन प्रसिद्ध शिक्षणतज्ञ दत्तात्रय वारे गुरुजी यांनी केले. अहमदपूर येथे द्वारकादास श्यामकुमार ग्रुपच्या वतीने आयोजित शिक्षक सन्मान सोहळा आणि मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाला राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्याचे आयोजन द्वारकादास श्यामकुमार ग्रुपचे सर्वेसर्वा तुकाराम पाटील, राजू पाटील, सदाशिव पाटील आणि संयोजन समितीने केले होते.
शिक्षकांचे कर्तव्य आणि तंत्रज्ञानाचा वापर
या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना दत्तात्रय वारे गुरुजी म्हणाले की, द्वारकादास श्यामकुमार ग्रुप शरीराला कपडे देऊन रक्षण करतो, तर शिक्षक आत्म्याला कपडे घालून चारित्र्याचे रक्षण करतात. शिक्षकांनी मुलांसाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले पाहिजे. मुलांनी स्वतःहून, एकमेकांच्या मदतीने किंवा तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिकावे यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत.
सध्याच्या युगात ज्ञानाचा वेग खूप वाढला आहे. पूर्वी ज्ञान दुप्पट होण्यासाठी २० ते ६० वर्षे लागायची, पण आता तो वेग अवघ्या अडीच वर्षांवर आला आहे. त्यामुळे शिक्षकांनी जुने वार्षिक नियोजन सोडून, अभ्यासक्रम तीन महिन्यांत पूर्ण करून विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यावर भर द्यावा. शाळा ही एक प्रयोगशाळा बनली पाहिजे, जिथे विद्यार्थी स्वतः शिकतील.
लोकसहभाग आणि सकारात्मकता आवश्यक
वारे गुरुजींनी शिक्षकांना सांगितले की, चांगल्या कामामध्ये अडचणी येतात, पण त्याकडे दुर्लक्ष करून सकारात्मकतेने काम करत राहा. देशाचे आणि राज्याचे नेतृत्व करणारे अनेकजण जिल्हा परिषदेच्या शाळांमधूनच शिकलेले आहेत.
ते म्हणाले की, शिक्षणात ज्ञानरचनावादाचा वापर महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर लोकसहभागाशिवाय जिल्हा परिषदेच्या शाळांचा विकास शक्य नाही. विद्यार्थ्यांना शिकवण्यासोबतच पालकांनाही शिक्षण देणे काळाची गरज बनली आहे.
या कार्यक्रमात तालुक्यातील आणि जिल्ह्यातील हजारो शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. द्वारकादास श्यामकुमार ग्रुप दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षकांचा गौरव करतो. यावेळी या ग्रुपने शिक्षकांना दत्तात्रय वारे गुरुजींसारख्या आदर्श व्यक्तिमत्त्वाचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले.
कार्यक्रमाला आरसीसीचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर, रामभाऊ बोरगांवकर, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांच्यासह अनेक मान्यवर आणि शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुकारामभैय्या पाटील यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. मारुती बुद्रुक पाटील आणि जीवन नवटक्के यांनी केले, तर सदाशिवभैया पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीने विशेष परिश्रम घेतले.
