सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही : सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील
हंडरगुळी ( गोविंद काळे ) सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,सरकार शेतकऱ्यांच्या पूर्ण पाठीशी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करायची गरज नाही. शेतकऱ्यांसाठी लवकरच दिलासादायक निर्णय घेतला जाईल असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी हंडरगुळी तालुका उदगीर येथे केले.
उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा आमदार संजय बनसोडे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे सह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना नामदार पाटील म्हणाले की, आजचा पुतळा अनावरण इतिहासात स्वर्ण अक्षराने लिहिणारा दिवस असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाच्या हस्ते अनावरण होणे हे अभिमानास्पद आहे. आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाने चालत आहोत. कमी कालावधीमध्ये जास्त किल्ले जिंकण्याचा विक्रम छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे. आमदारकी लक्षात ठेवण्यासाठी संस्थात्मक काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. हंडरगुळी शेतकऱ्यांचे गाव असून माझ्या माध्यमातून येथे लवकरच दूध डेअरीं प्रकल्प सुरू करू असे ते म्हणाले. पुतळा उभारल्यानंतर पुतळ्याचे संरक्षण करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी श्याम डावळे, राजेश्वर निटुरे, गोविंद केंद्रे, संजय बनसोडे, पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच बालाजी भोसले यांनी केले. सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता बालाजी साळुंखे , अनिता येलमटे, यांनी केले.
यावेळी गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते
