अहमदपुरात ‘आय लव्ह मोहम्मद’ ; मुस्लीम बांधवांचा विराट आक्रोश मोर्चा
अहमदपूर ( गोविंद काळे ) कानपूरमध्ये ‘आय लव्ह मोहम्मद’ बॅनर लावल्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या निषेधार्थ अहमदपूर येथे सकल मुस्लीम बांधवांनी शुक्रवारी, दिनांक २६ सप्टेंबर रोजी विराट आक्रोश मोर्चा काढला. हजारो मुस्लीम बांधवांनी ‘आय लव्ह मोहम्मद’ असे फलक झळकावून आपल्या धार्मिक भावनांचा जोरदारपणे उच्चार केला.
अहमदपूर येथील नगर परिषद टिपू सुलतान स्मारक मैदानात मोठ्या संख्येने जमलेल्या मुस्लीम समाजाने या निषेध रॅलीचे आयोजन केले होते. टिपू सुलतान चौकातून घोषणाबाजी करत निघालेल्या या रॅलीत तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचाही मोठा सहभाग होता. मोर्चेकऱ्यांच्या हातात ‘आय लव्ह मोहम्मद’ अशी लेख असलेली पोस्टर्स होती.
रॅलीदरम्यान, जमावाने कानपूरमधील घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आणि अशा प्रकारांना तातडीने थांबवण्याची मागणी केली. स्थानिक मुस्लीम संघटनांचे पदाधिकारी, विविध सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि धार्मिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. “धार्मिक भावना दुखावणारी कोणतीही कृती सहन केली जाणार नाही,” असा एकमुखी इशारा यावेळी देण्यात आला.
प्रशासनाकडे ठोस कारवाईची मागणी
मोर्चेकऱ्यांनी तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन, धार्मिक भावना दुखावणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने ठोस कारवाई करावी, अशी मागणी केली. उपस्थित मान्यवरांनी समाजात सौहार्द व शांतता टिकवण्याचे आवाहनही केले.
कडक पोलीस बंदोबस्त
मोठ्या प्रमाणावर जमलेल्या गर्दीमुळे पोलीस प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था कडक केली होती. अहमदपूर पोलीस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह मोठा पोलीस फौजफाटा संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आला होता. रॅलीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांच्या सजग बंदोबस्तामुळे आणि मोर्चेकऱ्यांनी दाखवलेल्या शिस्तीमुळे ही विराट रॅली शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.
धार्मिक नेत्यांनी कानपूरमध्ये घडलेल्या घटनेचा कठोर शब्दांत निषेध करत, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे, तसेच लोकांच्या धार्मिक भावना जपण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने वर्तन करणे आवश्यक असल्याचे आवाहन केले.
