नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांना दिलासा! सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केली अहमदपूरमधील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी
अहमदपूर ( गोविंद काळे ) सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची पाहणी करत, पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोठा भावनिक आधार दिला. मौजे नागझरी आणि खंडाळी या गावांना भेट देऊन त्यांनी अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आणि नुकसानीचा सखोल आढावा घेतला.
जोरदार पाऊस आणि पुरामुळे या भागात मोठे नुकसान झाले असून, अनेक शेतपिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे त्रस्त झालेल्या शेतकरी बांधवांनी यावेळी सहकार मंत्र्यांसमोर आपले दुःख आणि व्यथा मांडल्या. मंत्री पाटील यांनी अत्यंत सहानुभूतीपूर्वक त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
’घाबरू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत!’
शेतकरी आणि गावकऱ्यांशी भेट घेतल्यानंतर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी त्यांना धीर दिला. “पुरामुळे आलेलं संकट मोठं असलं तरी, आपण एकमेकांच्या साथीनं यावरही मात करू, असा मला पूर्ण विश्वास आहे. घाबरू नका, आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत,” अशा शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले.
या भागातील नुकसानीचे पंचनामे आणि मदत पोहोचवण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. या मदतकार्यात कोणताही विलंब होऊ नये, यासाठी आपण अधिकारी वर्गाशी सातत्याने समन्वय साधून आहोत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
या पाहणी दौऱ्याप्रसंगी उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्वला पांगरकर, तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे, सा.बा उपअभियंता गोविंद भोसले, जि. प बांधकाम उपअभियंता एस.एस पाटील यांच्यासह सर्व खात्याचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. या अधिकाऱ्यांशी चर्चा करून मंत्र्यांनी मदतकार्य अधिक प्रभावी करण्याच्या सूचना दिल्या.
