खाकीतला ‘देवमाणूस’! अपघातातील जखमींना RTO अधिकाऱ्याने दिली मायेची ऊब; स्वतःचा रुमाल बांधून केली मदत
पोलीस फ्लॅश न्यूज अहमदपूर (गोविंद काळे)कर्तव्य कठोर असले तरी माणुसकी आणि संवेदनशीलता जिवंत असते, याचा प्रत्यय लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (RTO) वरिष्ठ अधिकारी सुनील खंडागळे यांनी नुकताच उदगीर-तुळजापूर मार्गावर दिला. नवरात्र उत्सवानिमित्त विशेष तपासणी पथकासोबत तुळजापूरकडे जात असताना त्यांनी रस्त्यावरील अपघातातील गंभीर जखमी बाप-लेकांना केवळ मदतच केली नाही, तर मायेचा आधार दिला.
बोळेगाव पाटी येथे गर्दी जमलेली पाहून श्री. खंडागळे साहेबांनी तातडीने आपले शासकीय वाहन थांबवले. चौकशी केली असता, वाढवणा येथील एक पिता-पुत्र (अंदाजे ६५ आणि ३० वर्षे) रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत पडलेले दिसले. मुलगा वडिलांना डायलिसिससाठी दुचाकीवरून लातूरला घेऊन जात असताना ट्रकच्या धडकेमुळे हा अपघात झाला होता. वडिलांना डोक्याला आणि कंबरेला, तर मुलाला गुडघ्याखालील भागातून गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव होत होता.
संवेदनशीलतेचा स्पर्श:
जखमी अवस्थेत वृद्ध व्यक्तीच्या डोक्यावर रणरणते ऊन लागत असल्याचे खंडागळे लक्षात आले. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी आपल्या खिशातून नुकताच घेतलेला नवीन रुमाल काढला आणि मायेने त्यांच्या डोक्याला बांधला. रुमाल बांधण्याचा विषय किरकोळ असला तरी, त्या कृतीतून साहेबांनी जी संवेदनशीलता दाखवली, त्यामुळे उपस्थितांच्या मनात त्यांच्याबद्दल आदर निर्माण झाला.
त्यांनी जखमी पिता-पुत्रांना बोलून धीर दिला आणि ‘सर्व ठीक होईल’ असे सांगत त्यांची विचारपूस केली. वृद्ध वडिलांच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू आणि त्यांचा धीर खचलेला पाहून साहेबांनी त्वरित स्थानिक पोलीस स्टेशन व अँब्युलन्सला फोनद्वारे बोलावून घेतले. तातडीने उपचारासाठी दोन्ही जखमींना अँब्युलन्सद्वारे लातूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. जाताना जखमी अवस्थेतही त्या बाप-लेकांनी हाताच्या इशाऱ्याने साहेबांचे आभार मानले.
खाकीतला ‘देव’:
हा सारा प्रसंग जवळून पाहणाऱ्या एका २२-२३ वर्षाच्या तरुणाने खंडागळे यांच्या जवळ येऊन आपुलकीने आणि मृदू स्वरात उद्गार काढले, “साहेब, तुम्ही खाकीतले देवच वाटलात ओ, इतक्या काळजीने-प्रेमाने बोलला!” त्यावर, “असे काही नाही” म्हणत खंडागळे यांनी त्याच्या पाठीवर थाप दिली आणि आपले तपासणी पथकाचे शासकीय वाहन घेऊन तुळजापूरच्या दिशेने मार्गस्थ झाले.
यावेळी, दोघांनाही चांगले आरोग्य लाभेल, यासाठी त्यांनी तुळजाभवानी मातेचरणी प्रार्थना केली. यापूर्वी, पंढरपूर यात्रेनिमित्त कार्यरत असताना पंढरपूर-कुर्डूवाडी येथेही अशाच एका अपघातातील जखमींना त्यांनी आपल्या RTO च्या शासकीय वाहनातून रुग्णालयात सोडले होते.
सुनील खंडागळे यांनी आपल्या कर्तव्यदक्षतेसोबतच माणुसकीचा जो आदर्श घालून दिला आहे, तो निश्चितच प्रेरणादायी आहे. RTO च्या खाकीतील हा ‘देवमाणूस’ केवळ दंडुका चालवणारा अधिकारी नाही, तर गरजूंना मदतीचा हात देणारा संवेदनशील नागरिक आहे, याचा सार्थ अभिमान लातूर विभागाला वाटतो!
