राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांना समाजसेवेचे धडे मिळतात – ह. भ. प.डाॅ. अनिल महाराज मुंढे
अहमदपूर ( गोविंद काळे)
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्व घडत असते. राष्ट्रीय सेवा योजना ही जीवनाला आकार देणारी कार्यशाळा असून, राष्ट्रीय सेवा योजनेतूनच विद्यार्थ्यांना समाजसेवेचे धडे मिळतात, असे प्रतिपादन ह. भ.प.डाॅ. अनिल महाराज मुंढे यांनी केले.
येथील महात्मा फुले महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन, विद्यार्थी उद्बोधन व हिंदी पखवाडा उद्घाटन या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक, कथा- कादंबरीकार तथा ज्येष्ठ पत्रकार प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते; तर विचारपीठावर उपप्राचार्य तथा आयक्यूएसी समन्वयक डॉ. दुर्गादास चौधरी, कार्यक्रमाचे संयोजक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सतीश ससाणे, हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. नागराज मुळे उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना डॉ. मुंढे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सतत कार्यरत राहण्याचा संदेश विद्यार्थ्यांना मिळतो. तसेच खेड्यापाड्यात जाऊन समाजाची सेवा करता येते. विद्यार्थ्यांनी समाजाचे ऋण राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून फेडावे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे श्रमाचे संस्कार करणारे विद्यापीठ होय. राष्ट्रीय सेवा योजनेमुळेच विद्यार्थ्यांना सामाजिक समस्यांचा परिचय होतो, तसेच राष्ट्राची जडणघडण करण्याची प्रेरणा मिळते असे ते म्हणाले.
यावेळी हिंदी विभाग प्रमुख डॉ. नागराज मुळे, तसेच उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी हिंदी भाषेचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन गर्जे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. सतीश ससाणे यांनी केले, तर शेवटी सर्वांचे आभार डॉ. प्रकाश चौकटे यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
