राष्ट्रभावासह श्रम संस्काराचे केंद्रबिंदू म्हणजे ‘रासेयो’ – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार
अहमदपूर,( गोविंद काळे )
राष्ट्रीय व सामाजिक दायित्वांची जाणीव करून देऊन श्रम संस्कारांने व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो व त्यातूनच सक्षम नागरिक घडविण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून होत असते. राष्ट्रभावासह श्रम संस्काराचे केंद्रबिंदू म्हणजे ‘रासेयो’ होय,असे स्पष्ट प्रतिपादन मराठी साहित्याचे ज्येष्ठ समीक्षक तथा साहित्यकार प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या आय.क्यु.ए.सी. विभागांतर्गत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या महाविद्यालयत असलेल्या एन.एस.एस. विभागाच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘ स्वच्छता हीच सेवा ‘ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील होते तर यावेळी उपप्राचार्य प्रो. डॉ. दुर्गादास चौधरी, कार्यक्रमाधिकारी डॉ. संतोष पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाविद्यालय परिसरात कार्यक्रमाधिकारी डॉ.बी.के. मोरे, प्रो. डॉ. सतीश ससाणे, डॉ. संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी पुढे बोलतांना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राष्ट्र उद्धाराचे तसेच सामाजिक जाणीव निर्माण करून देण्याचे विविध कार्यक्रम घेण्यात येतात. त्यातूनच राष्ट्र आणि समाज मजबूत करणारी युवाशक्ती देशाला मिळते, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ. संतोष पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. पी. पी. चौकटे यांनी तर आभार डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या बहुसंख्येने उपस्थित होते.
