अहमदपूर तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच; थोडगा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
अहमदपूर, ( गोविंद काळे) – अहमदपूर तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबताना दिसत नाहीये. तालुक्यातील मौजे थोडगा येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
भास्कर तरडे (वय ४८) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांना केवळ एक एकर जमीन असून, त्यांच्यावर बँकेचे ४० हजार रुपयांचे कर्ज होते. याव्यतिरिक्त त्यांच्यावर खाजगी सावकाराचेही कर्ज असल्याचे बोलले जात आहे.
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे तरडे यांच्या सोयाबीनच्या शेतात पाणी साचले होते. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आणि कर्जाची परतफेड कशी करायची, या मोठ्या विवंचनेत ते होते. याच नैराश्यातून त्यांनी गावातील एका सरकारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. या घटनेमुळे थोडगा गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्येची ही मालिका चिंताजनक असून, प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
