“निसर्गाचे संवर्धन करणे प्रत्येकाचे कर्तव्य”: डॉ. एल. एच. पाटील
अहमदपूर ( गोविंद काळे) – शाश्वत विकासाच्या दृष्टीने भारतीय संस्कृती अत्यंत समृद्ध आणि जागृत असून, या संस्कृतीने निर्माण केलेले सण-उत्सव निसर्गाच्या संवर्धनासाठी उपयुक्त आहेत. त्यामुळे निसर्गाचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे महत्त्वपूर्ण मत स्वारातीम विद्यापीठाचे अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. एल. एच. पाटील यांनी व्यक्त केले.
येथील विचार विकास मंडळ संचलित महात्मा गांधी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ‘शाश्वत विकासाचे ध्येय व उपलब्धी’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
भारतीय संस्कृती आणि निसर्गवाद
डॉ. पाटील पुढे म्हणाले की, आपले संत आणि महामानव यांनी निसर्गामध्ये ईश्वर पाहिला. निसर्गवादी विचारसरणी सुद्धा निसर्गालाच परमेश्वर मानते. कौटिल्यानेही निसर्गाला राज्य आणि देशाच्या विकासाचा मार्ग मानले, तर संत तुकारामांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असे सांगितले आहे. मात्र, आधुनिक काळात औद्योगिकीकरणामुळे मोठे बदल झाले. मानवाने भौतिक प्रगती करताना निसर्गाकडे दुर्लक्ष केले, ज्यामुळे निसर्गाचा ऱ्हास होत आहे. निसर्गाचा ऱ्हास म्हणजे मानवी जीवसृष्टीचा ऱ्हास आहे. त्यामुळे जीवसृष्टी टिकवायची असेल, तर निसर्गाचे संवर्धन करणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आणि कर्तव्य आहे, असे विस्तृत प्रतिपादन त्यांनी केले.
अध्यक्षांनी मांडले विचार
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ‘कॉटन फिजिक्स’ ही विचारसरणी शाश्वत विकासाच्या दृष्टीने निसर्गवादाला कसे महत्त्व देते, यावर आपले विचार मांडले.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी विचारपीठावर संस्थेचे सहसचिव श्री. सुरेशराव देशमुख, प्रा. नानासाहेब पटनुरे, उपप्राचार्य डॉ. अनिल कांबळे, प्रसिद्धीप्रमुख डॉ. यादव सूर्यवंशी, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजश्री जाधव, डॉ. प्रकाश देशमुख, एन.एस.एस. विभागप्रमुख डॉ. बी. के. पाटील, प्रा. डॉ. संजय साठे, ग्रंथपाल डॉ. एस. आर. सुळसुळे, डॉ. सुचिता जाधव, प्रा. मंगरूळकर मॅडम, प्रा. कासले मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ. राजश्री जाधव यांनी केले. प्रीती मेकाले या विद्यार्थिनीने सूत्रसंचालन केले, तर दर्शना रेणुका हिने उपस्थितांचे आभार मानले. या व्याख्यानाला महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
