थोडगा येथील पूरपरिस्थितीची पाहणी; शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डींचा प्रशासनाला मदतीसाठी अल्टिमेटम
अहमदपूर ( गोविंद काळे ) तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे थोडगा गावात निर्माण झालेल्या गंभीर पूरपरिस्थितीची पाहणी आज सकाळी शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी केली. गावाचे उपसरपंच शरद मुंडे यांनी फोनवरून माहिती देताच, रेड्डी यांनी तातडीने सकाळी सात वाजता थोडगा गाठले आणि प्रशासनाला तातडीने मदतीचे निर्देश दिले.
गुडघाभर पाण्यातून पाहणी, नुकसानग्रस्तांना दिलासा
रेड्डी यांनी गुडघाभर पाण्यातून संपूर्ण गावाची पाहणी केली आणि पूरग्रस्त नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरातील कपडे, धान्य आणि घरगुती साहित्याची मोठी नासाडी झाली होती. हे विदारक चित्र पाहून त्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील प्रशासनाशी संपर्क साधला.
तात्काळ मदत: त्यांनी तहसीलदारांना नुकसानग्रस्तांना स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत मोफत धान्य देण्याची मागणी केली. यानुसार, तहसीलदार उज्वला पांगरकर यांनी स्वस्त धान्य दुकानदार बाळासाहेब तरडे यांना तातडीने धान्य वाटप करण्याचे निर्देश दिले.
पाझर तलावांच्या सुरक्षिततेवर भर
दरम्यान, नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे गावातील रस्ते आणि गल्लीबोळ पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. रेड्डी यांनी पाटबंधारे विभागाचे अभियंता तामलवाड यांच्याशी चर्चा करून पाझर तलाव आणि साठवण तलावांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे आदेश दिले. मागील वर्षी झालेल्या पाझर तलाव फुटीसारखी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी अत्यंत दक्ष राहण्याची सक्त ताकीद त्यांनी यावेळी दिली.
नगरपरिषदेला स्वच्छतेच्या सूचना
शहरातील नाल्यांमधील कचरा, पाण्याने भरलेले खड्डे आणि रस्त्यावर साचलेला ओघ पाहून त्यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष लोमटे यांच्याशी संपर्क साधला. शहरातील जलमय झालेले भाग आणि घाण लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ स्वच्छता मोहिम हाती घेण्याच्या सूचना दिल्या.
शेतकऱ्यांना धीर, शासनाला अल्टिमेटम
या पूरपरिस्थितीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांशी बोलताना रेड्डी यांनी त्यांना धीर दिला. ते म्हणाले, “हे अस्मानी संकट गंभीर आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे, पण काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.”
यावेळी त्यांनी शासनाला कडक इशारा देत म्हणाले, “शासनाने या नुकसानीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने शेतकऱ्यांना ५० हजार रुपये हेक्टरी मदत दिली नाही, तर आम्ही शांत बसणार नाही.”
या पाहणी दौऱ्यावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
