महात्मा फुले महाविद्यालयात मराठी विश्वकोश नोंद लेखन कार्यशाळेचे आयोजन

0
महात्मा फुले महाविद्यालयात मराठी विश्वकोश नोंद लेखन कार्यशाळेचे आयोजन

अहमदपूर ( गोविंद काळे)
येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई आणि मराठी विभाग, महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर जि. लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी २९ सप्टेंबर २०२५ रोजी मराठी विश्वकोश नोंद लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महात्मा फुले महाविद्यालयाला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक, कादंबरीकार तथा ज्येष्ठ पत्रकार प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबविले जात असून त्याचाच एक भाग म्हणून भारतीय भाषा, साहित्य आणि लोकसाहित्य यांच्या अनुषंगाने मराठी विश्वकोश नोंद लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, मराठी भाषेतून ज्ञान निर्मिती व्हावी यासाठी विश्वकोश निर्मिती हा प्रकल्प राबविला जातो. सदर कार्यशाळेच्या माध्यमातून भारतीय भाषा, साहित्य आणि लोकसाहित्य या संदर्भाने विश्वकोशामध्ये नोंदलेखन कसे करावे, याबाबतची माहिती दिली जाणार आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटन सोमवार दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०. ३० वाजता प्रसिद्ध कथा- कादंबरीकार तथा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक आसाराम लोमटे यांच्या हस्ते होणार असून, या समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष रवींद्र शोभणे हे भूषविणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य डॉ. सुरेश कदम, वाई येथील महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे विद्याव्यासंगी सहाय्यक डॉ. जगतानंद भटकर, किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी. टी.शिंदे, मराठवाडा साहित्य परिषद शाखा अहमदपूरचे अध्यक्ष सत्यनारायणभाऊ काळे तसेच ‘दैनिक यशवंत’ चे संपादक बी.व्ही. मोतीपवळे (लातूर), प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य तथा आयक्यूएसी समन्वयक डॉ. दुर्गादास चौधरी इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
‘मराठी विश्वकोश नोंद व लेखन परंपरा’ या विषयावर पहिले सत्र होणार असून, या सत्राचे अध्यक्षस्थान विमलाबाई देशमुख विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सौ. सुनंदा कुलकर्णी या भूषविणार असून, वक्ते म्हणून डॉ. जगतानंद भटकर (विद्याव्यासंगी सहाय्यक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ) हे उपस्थित राहणार आहेत.
दुसरे सत्र ‘कृषी संस्कृती कोश’ या विषयावर संपन्न होत असून, यावेळी अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरचे माजी अध्यक्ष प्रो. डॉ. भारत हंडीबाग हे उपस्थित राहणार असून, वक्ते म्हणून सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक प्रा. द. मा. माने हे उपस्थित राहणार आहेत. कार्यशाळेचा समारोप दुपारी ३ ते ४ या वेळेत होणार असून, समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी अहमदपूर तालुका मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष महेंद्र खंडागळे हे राहणार आहेत. तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे भाषा संकुल प्रमुख तथा सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. दिलीप चव्हाण हे मार्गदर्शन करणार आहेत. मराठी तसेच मानव्य विद्याशाखेच्या सर्व प्राध्यापक, शिक्षक व अभ्यासकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यशाळेचे संयोजक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, समन्वयक डॉ. अनिल मुंढे व डॉ. मारोती कसाब यांच्यासह सर्व प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थ्यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!