दिल्लीच्या राजकारणात महाराष्ट्र कुठे आहे? – प्रथमेश तेलंग
उदगीर (प्रतिनिधी) येथील दि. लिं. होळीकर प्रतिष्ठानतर्फे आयोजित दि. लिं. होळीकर स्मृती व्याख्यानमालाच्या बाराव्या पुष्पात “दिल्लीच्या राजकारणात महाराष्ट्र कुठे आहे?” या विषयावर पत्रकार व अभ्यासू राजकीय विश्लेषक प्रथमेश तेलंग दिल्ली यांनी सखोल व्याख्यान देत महाराष्ट्राच्या राजकीय सहभागाचा वस्तुनिष्ठ आढावा सादर केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मसाप केंद्रीय कार्यकारिणीचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राम जाधव, साईनाथ महादावाड व आदर्श शिक्षक मोमिन देवणीकर हे होते. प्रास्ताविक प्रा. माधव कांबळे यांनी करत प्रतिष्ठानच्या कार्याचा व स्मृती व्याख्यानमालेच्या उद्देशाचा थोडक्यात परिचय करून दिला. पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. दत्ताहरी होनराव यांनी करून दिला तर कु. अवनी स्वामी हीने स्वागत गीत गायिले.
पत्रकार प्रथमेश तेलंग यांनी आपल्या व्याख्यानात महाराष्ट्राच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेतला. दिल्लीतील सत्ताकेंद्रात महाराष्ट्राची भूमिका, त्याचे ऐतिहासिक योगदान, केंद्र-राज्य संबंधातील बदलते समीकरण, तसेच स्वातंत्र्योत्तर काळातील राष्ट्रीय धोरणनिर्मितीत महाराष्ट्रातील नेतृत्वाचा सहभाग यावर त्यांनी सखोल विवेचन केले.
सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही पातळ्यांवरील महाराष्ट्राच्या सहभागाचे विश्लेषण करताना त्यांनी टिळकांपासून आजपर्यंतच्या प्रवाहाचा वस्तुनिष्ठ मागोवा घेतला. संसदेचे पहिले सभापती ग.मा.मावळकर, अर्थमंत्री सी.डी. देशमुख, यशवंतराव चव्हाण, शिवराज पाटील चाकूरकर, शरद पवार, प्रमोद महाजन, विनोद तावडे व प्रणिती शिंदे असे सर्व संदर्भ देत अत्यंत ओघवत्या शैलीत सहजपणे हा राजकारणाचा पट उलगडून दाखवला. दिल्लीच्या राजकारणात महाराष्ट्रावर विशेष लक्ष का व कसे असते? मराठी नेते मुत्सद्दीपणात कसे तुलनेनी कमी पडतात, मराठी नेत्यांचे मन दिल्लीत लागत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा एक आशेचा किरण असल्याचे मत व्यक्त करून त्यांच्या समोर पक्षांतर्गत असलेल्या आव्हानाचाही मार्मिकपणे उल्लेख केला. अध्यक्षीय समारोपात रामचंद्र तिरुके म्हणाले, शिवराज पाटील चाकूरकर यांना आपण निवडून दिलो असतो तर ते पंतप्रधान झाले असते. कारण लोकसभेला पराभूत होऊनही ते देशाचे गृहमंत्री झाले. असे दाखले देत पत्रकार दिल्लीत आपल्या स्वकर्तृत्वावर स्थान निर्माण केल्याबद्दल व त्यांच्या वैचारिक मांडणीचे कौतुक केले.
यावेळी मोमिन देवणीकर या जमूर हायस्कूलच्या शिक्षकास दि.लिं. होळीकर आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्याख्यानानंतर उपस्थितांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून चर्चेत सहभाग घेतला.दि. लिं. होळीकर प्रतिष्ठानतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून विविध विषयांवर व्याख्यान मालेद्वारे जनजागृती व बौद्धिक वातावरण निर्मितीचे कार्य सुरू असून या व्याख्यानमालेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश साखरे, गोविंद सावरावे, तुकाराम बिरादार, प्रा. मनोहर भालके, शिवशंकर पाटील, तुळशीदास बिरादार, बाबुराव सोमवंशी, डॉ . गौरव जेवळीकर प्रयत्न केले. डॉ. अनिल भिकाणे, विश्वनाथ मुडपे, व्ही.एस. कुलकर्णी ,शिवप्रताप पाटील, प्रा.सुनिल विरकपाळे, सर्वेश होनराव, प्रतिष्ठान नागरिक, शिक्षक, पत्रकार , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर या कार्यक्रमाचे संचालन यशवंतराव बिरादार व विरभद्र स्वामी यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. बालाजी सूर्यवंशी यांनी मानले.
