सेवा पंधरवडा अभियान नागरिकांमध्ये श्रमप्रतिष्ठा निर्माण करणारा – डॉ. शरद कुमार तेलगाणे
उदगीर (एल पी उगिले) देशाचे पंतप्रधान एक ऊर्जापुरुष तसेच विकासाची दूरदृष्टी असलेले नेतृत्व नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, अभिष्टचिंतन सोहळा ते महात्मा गांधीजींच्या जयंती पर्यंत भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा पंधरवाडा अभियान राबवण्यात येत आहे. सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत शासकीय कार्यालयातील कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी, कर्मचारी यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमेसोबतच श्रमदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे. ही गोष्ट कौतुकास्पद आहे. कारण या अभियानातून नागरिकांच्या मनामध्ये श्रम प्रतिष्ठा निर्माण होईल.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जेव्हा जपान देशाच्या दौऱ्यावर होते, त्यावेळेस त्या ठिकाणची स्वच्छता आणि नागरिकांचे स्वच्छते बद्दलची कामगिरी प्रत्यक्ष पाहिली आणि तशा पद्धतीची काही प्रमाणात तरी आपल्या देशातही स्वच्छता राबवण्यासाठी नागरिक पुढे यावेत, या भावनेने स्वच्छते बद्दल त्यांनी मन की बातच्या माध्यमातून जनतेला आवाहन ही केले होते. तोच धागा पकडून भारतीय जनता पक्षाने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवडा साजरा करण्याचा निर्धार केला आहे. या उपक्रमांतर्गत तरुणांमध्ये आणि नागरिकांमध्ये श्रम प्रतिष्ठेची बीज पेरली जातील. असे विचार राष्ट्रीय मोदी सेवा समिती संपूर्ण भारतचे प्रदेश संघटन महामंत्री तथा उदगीर येथील ओम हॉस्पिटल अँड मॅटर्निटी होम चे संस्थापक एक प्रबोधनात्मक कीर्तनकार असलेल्या डॉ. शरदकुमार तेलगाने यांनी व्यक्त केले आहेत.
सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत स्वच्छता अभियान राबवत असताना भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे, भाजपचे शहराध्यक्ष अमोल अनकल्ले, शहर उपाध्यक्ष महेश मुळे,माजी नगरसेवक नागेश अष्टुरे, साधू लोणीकर हे प्रत्यक्ष अभियानात कार्यरत असताना राष्ट्रीय मोदी सेवा समिती संपूर्ण भारतचे प्रदेश संघटन महामंत्री डॉ. शरदकुमार कचरू तेलगाने व कुमारी जान्हवी शरदकुमार तेलगाने यांनी या अभियान राबवणाऱ्या तरुणांचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, राष्ट्रीय मोदी सेवा समिती संपूर्ण भारत या संघटनेच्या वतीने केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची पूर्ण फळी कार्यरत असून शासनाच्या सकारात्मक कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला जातो आहे. सर्व भारतीयांचे हे आद्य कर्तव्य आहे की, खऱ्या लाभार्थ्यापर्यंत शासनाने राबवलेल्या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. कित्येक वेळा त्या योजनांची माहिती नसल्यामुळे लाभार्थी वंचित राहतात, आणि योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. दलाल त्याचा लाभ घेतात, हे टाळण्यासाठी खऱ्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे. आणि शासनाचे ध्येय धोरण साध्य झाले पाहिजे. असेही विचार डॉ. शरदकुमार तेलगाने यांनी व्यक्त केले.
