सिद्धी शुगर साखर कारखाना पूर्ण क्षमतेने चालवणार – सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील
अहमदपूर ( गोविंद काळे ) सिद्धी शुगर साखर कारखाना या गळीत हंगामात पूर्ण क्षमतेने चालवणार असल्याची ग्वाही राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी दिली. अहमदपूर तालुक्यातील उजना येथील सिद्धी शुगर अँड अलाईट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडच्या १४ व्या गळीत हंगामाच्या अग्नि प्रदीपन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
शेतकऱ्यांनी संकटांना सामोरे जावे, सरकार तुमच्यासोबत
यावेळी बोलताना सहकार मंत्री नामदार पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. ते म्हणाले की, शेतकऱ्यांनी कोणताही संकुचित विचार न करता सर्व संकटांना धैर्याने सामोरे जावे. “सरकार म्हणून आम्ही तुमच्यासोबत आहोत,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी नुकसान भरपाई आणि अनुदान याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली. ते म्हणाले, “अगदी काही दिवसांत पहिल्या टप्प्यातील नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल आणि दुसऱ्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत, त्यांनाही अनुदान लवकरच प्राप्त होईल.”
उसाची परिस्थिती चांगली असून, यावर्षी सिद्धी शुगर कारखान्याने साडेसहा लाख टन क्रशिंगचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यावर्षीचा गाळप हंगामही यशस्वीरित्या पूर्ण होईल, असा विश्वास नामदार पाटील यांनी व्यक्त केला.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, भागवताचार्य कृष्णा महाराज धानोरकर, माजी सरपंच साहेबराव जाधव, व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव, सिद्धी शुगरचे व्हाईस प्रेसिडेंट पी. जी. होनराव, दीनानाथ राचमाळे, हेमंतराव जाधव, धनराज धुमाळ, शिवानंद हेंगणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके, अहमदपूरचे मुख्याधिकारी संतोष लोमटे, शिरूर ताजबंदचे उपसरपंच सुरज पाटील, जनरल मॅनेजर पी. एल. मिटकर तसेच कारखान्याचे संचालक, चेअरमन, सदस्य, कामगार आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
यावेळी कृष्णा महाराज धानोरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चोपणे दयानंद यांनी केले, तर पी. जी. होनराव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
