माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांनी जाणून घेतल्या पशुधन पर्यवेक्षकांच्या अडचणी
लातूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेअंतर्गत येणार्या पशुसंवर्धन विभागामध्ये कार्यरत असणारे पशुधन पर्यवेक्षक व सहायक पशुधन अधिकारी या सवंर्गाच्या प्रमुख 11 प्रलंबीत मागण्याच्यास संदर्भात पशुचिकित्सा व्यवसायी संघटना,महाराष्ट्रच्यावतीने राज्यातील त्या-त्या पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे कोणीही शासकीय यंत्रणा लक्ष देत नाही. ही बाब लक्षात घेऊन भाजपा नेता तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी पशुधन पर्यवेक्षकांच्या समस्या जाणून घेवून त्यांच्या मागण्यासाठी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना.सुनिलजी केदार यांच्याकडे पाठपुरावा करून आपले प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिल्यामुळे जिल्ह्यातील पशुधन पर्यवेक्षकांना दिलासा मिळाला आहे. पशुचिकीत्सा व्यवसायी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या लातूर जिल्हा शाखेच्यावतीने भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये सहायक आयुक्त पशुसंवर्धन व पशुधन विकास अधिकारी गट अ सेवाप्रवेश नियमात सुधारणा करण्यात यावी, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) गट-अ पंचायत समिती या पदनामात बदल न करणे पशुुधन पर्यवेक्षक व सहायक पशुधन अधिकारी यांना देण्यात आलेल्या तिसर्या लाभाच्या वेतन निश्चीतीत सुधारणा करणे, ग्रामसेवक व कृषी सहायकाच्या धर्तीवर सवंर्गातील कर्मचार्यांना दरमहा वेतनातून कायम प्रवास भत्ता मंजूर करण्यात यावा. पदविका व प्रमाणपत्र धारकांची शैक्षणिक अर्हता भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा 1984 च्या पहिल्या अनुसुचित समाविष्ठ करणे. तसेच शासन अधिसुचना दि.27 ऑगस्ट 2009 रद्द करून सुधारित अधिसुचना निर्गमित करणे, पशुसंवर्धन विभागातील अधिकारी कर्मचारी यांना फ्रंन्ट वर्कर किंवा कोव्हिड वॉरियर्स म्हणून घोषीत करून विमा सुरक्षा कवच व अत्यावश्यक सुविधेतील सेवा देण्यात याव्यात, पशुधन विकास अधिकारी गट-ब पदोन्नती संदर्भातील मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायधिकरण नागपूर येथील प्रलंबीत याचिकेसंदर्भात पाठपुरावा करावा, जिल्हा परिषद व राज्यस्तरावरील पशुधन पर्यवेक्षकांची रिक्त पदे त्वरीत भरण्यात यावी, राज्यात 12 वी नंतर 3 वर्षाचा पशुसंवर्धन विषयक अभ्यासक्रम सुरू करावा, पशुधन पर्यवेक्षक यांना सहायक पशुधन विकास अधिकारी या पदावर पदोन्नती देण्यात यावी. तसेच राज्य शासनाअंतर्गत कार्यरत सहायक पशुधन अधिकारी या पदाचा विभागनिहाय समतोल दुर करावा आदी मागण्याचा समावेश आहे. यावेळी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या समवेत जननायक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुर्यकांतराव शेळके उपस्थित होते. तसेच पशुचिकित्सा व्यवसायी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या लातूर शाखेचे जिल्हाध्यक्ष डॉ.जी.आर.सरवदे विभागिय सहसचिव डॉ.एच.डी.कोळेकर, उपाध्यक्ष डॉ.एच.जी.कुंभार, कोषाध्यक्ष डॉ.एम.एस.स्वामी, तालुका अध्यक्ष डॉ.डी.एस.खडबडे, सचिव डॉ.एस.जी.रेड्डी , खाजगी सेवादाता संघटनेचे अध्यक्ष डॉ.ए.बी.ढवारे, डॉ.व्ही.एच.बिराजदार,सेवादाता संघटनेचे सचिव डॉ.एस.एच.बोरगावकर, डॉ.एस.पी.उदारे, डॉ.एम.एस.साबळे, डॉ.ए.आर.रसाळ, डॉ.टी.एम.सोळंके, डी.ए.जाधव, डी.बी.शेल्लाळे, वियजकुमार सरवदे आदी उपस्थित होते.