महात्मा फुले महाविद्यालयात ‘ समकालीन भारतातील सांस्कृतिक वारसा’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
अहमदपूर ( गोविंद काळे)
‘समकालीन भारतातील सांस्कृतिक वारसा: ओळख आणि आधुनिकता’ या विषयावर शुक्रवार, दि.३ ऑक्टोबर २०२५ रोजी येथील महात्मा फुले महाविद्यालयात इंग्रजी व भूगोल विभागाच्या वतीने एकदिवसीय आंतरविद्याशाखीय, राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक, कादंबरीकार तथा ज्येष्ठ पत्रकार प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवार दि. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी एक दिवसीय आंतरविद्याशाखीय, राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ‘समकालीन भारतातील सांस्कृतिक वारसा: ओळख आणि आधुनिकता’ या विषयावर हे चर्चासत्र होत असून, त्या अनुषंगाने देशभरातील विविध अभ्यासक , संशोधक, शोधनिबंध लेखक, प्राध्यापक या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत.
महाविद्यालयाच्या महात्मा फुले सभागृहात सकाळी साडेदहा वाजता या चर्चासत्राचा उद्घाटन समारंभ होणार असून, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री.पी.टी. शिंदे हे राहणार आहेत. तर प्राचार्य डॉ. शरद हेबाळकर (माजी प्राचार्य, खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई, तथा सचिव, अखिल भारतीय इतिहास संकलन परिषद) यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्घाटन होणार आहे. यावेळी बीजभाषक म्हणून मध्य प्रदेशातील हरी सिंग गौर विद्यापीठाचे यूजीसी एमएमटीटीसी संचालक प्रोफेसर डॉ. आर. टी. बेद्रे हे उपस्थित राहणार आहेत.यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे बिदर जिल्हा सचिव श्री. पृथ्वीराज अशोकराव पाटील एकंबेकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
उद्घाटनानंतर होणाऱ्या विविध सत्रांमध्ये डॉ. उत्तमराव कानवटे( भूगोल विभाग, वसंतराव नाईक महाविद्यालय, नांदेड), डॉ. अलका देशमुख ( वसुंधरा महाविद्यालय, घाटनांदूर) डॉ. जयदीप सोळुंके ( श्री. पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालय, सिरसाळा ता. परळी वैजनाथ ) डॉ. नितीन देशमुख ( महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर) आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. या चर्चासत्राचा समारोप दुपारी साडेचार वाजता किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री. माधवराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनिल शिंगारे (प्राचार्य, ज्ञानसाधना महाविद्यालय, परभणी तथा माजी अध्यक्ष मराठवाडा इतिहास परिषद ) हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सचिव तथा ज्येष्ठ संचालक श्री. डी.आर. झोडगे गुरुजी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
या राष्ट्रीय चर्चासत्रास उपस्थित राहण्याचे आवाहन चर्चासत्राचे मुख्य संयोजक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, चर्चासत्राचे समन्वयक डॉ. किरण गुट्टे, सहसमन्वयक डॉ. दिगंबर माने यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी केले आहे.
