महात्मा गांधी महाविद्यालयाच्या ‘आपदा मित्र’ विद्यार्थ्यांकडून पुरात अडकलेल्या मजुरांची सुटका
अहमदपूर ( गोविंद काळे): काही दिवसापुर्वी सर्वत्र पावसाने थैमान घातले होते अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळत होता. सततच्या अतिवृष्टीमुळे अनेक गावे आणि वस्त्यांचा संपर्क तुटला होता. अशातच, अहमदपूर तालुक्यातील चिलखा येथील मन्याड नदीला आलेल्या महापुरामध्ये अडकलेल्या तीन मजुरांची सुटका महात्मा गांधी महाविद्यालयातील ‘आपदा मित्र’ विद्यार्थ्यांनी तत्परतेने केली आहे.
जिल्हा प्रशासनाकडून या दुर्घटनेची माहिती मिळताच महाविद्यालयाचे ‘आपदा मित्र’ विद्यार्थी तात्काळ घटनास्थळी हजर झाले आणि त्यांनी यशस्वी बचाव कार्य केले.
प्रशिक्षणाचा उपयोग, जिवाची बाजी
इंडियन रेस्क्यू अकॅडमी, महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने १८ ते ३० जून २०२५ दरम्यान रायगड येथे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण महात्मा गांधी महाविद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांनी घेतले होते. याच प्रशिक्षित विद्यार्थ्यांपैकी सूर्यकांत सीताराम पवार आणि मारोती पुरूषोत्तम कदम या दोघांना लातूर जिल्हा प्रशासनाकडून घटनेची माहिती मिळाली.
या विद्यार्थ्यांनी पोलीस मुख्यालय येथील रेस्क्यू टीममधील पोलीस कॉन्स्टेबल रियाज देशमुख यांच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले. तालुक्यातील सर्वात मोठी नदी असलेल्या मन्याड नदीच्या महापुरात हे तिघे मजूर पहाटेपासून अडकले होते.
अल्ली कौसर (वय २३, रा. बिहार), रामकिशन भुजंग कांबळे (वय ४५, रा. जांब हिप्परगा) आणि नंदकुमार शंकरराव वळसे (वय ५०, रा. मंगनाळी, ता. कंधार, जि. नांदेड) या तिघांनाही या आपदा मित्र विद्यार्थ्यांनी दुपारी एक वाजता पुराच्या पाण्यातून सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळवले.
प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा
बचाव कार्यादरम्यान उपविभागीय अधिकारी डॉ. मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्वला पांगरकर, पो. नि. बिरप्पा भूसनुर आणि इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तसेच, महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि पुरातून सुटका झालेल्या व्यक्तींची विचारपूस केली. पुढील उपचारासाठी त्यांना लातूर येथे हलविण्यात आले आहे.
महात्मा गांधी महाविद्यालयाच्या ‘आपदा मित्र’ विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या तत्परतेचे, शौर्याचे आणि सामाजिक बांधिलकीचे कौतुक महाविद्यालय परिवार आणि अहमदपूर परिसरामध्ये सर्वत्र केले जात आहे.
