भाषेने साहित्याला आणि लोकसाहित्याला जन्म दिला -डॉ.आसाराम लोमटे-

0
भाषेने साहित्याला आणि लोकसाहित्याला जन्म दिला -डॉ.आसाराम लोमटे-

अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ मुंबईच्या संयुक्तविद्यमाने भारतीय भाषा, साहित्य आणि लोकसाहित्य विश्वकोश नोंद लेखन कार्यशाळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

अहमदपूर, ( गोविंद काळे )
साहित्य हे समाजाच्या हिताचे तर भाषा ज्ञानाची निर्मिती करून त्याचे संपादन करते व पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करते. कारण माणसाला केंद्रस्थानी ठेवून भाषेने साहित्याला आणि लोकसाहित्याला जन्म दिला आहे, असे स्पष्ट प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध लेखक डॉ.आसाराम लोमटे यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग मुंबई, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ मुंबई व महाविद्यालयाच्या आयक्युएसी विभागांतर्गत मराठी विभागाच्या वतीने महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ‘भारतीय भाषा, साहित्य आणि लोकसाहित्य ‘ या विषयावर विश्वकोश नोंद लेखन कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे सचिव पी. टी. शिंदे हे होते तर उद्घाटक म्हणून मराठी साहित्याचे जेष्ठ साहित्यकार साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक डॉ. आसाराम लोमटे व डॉ. सुरेश कदम , जगतानंद भटकर , सत्यनारायण भाऊ काळे अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद अहमदपूर, ॲड.बी. व्ही. मोतीपवळे संपादक दैनिक यशवंत लातूर यांच्यासह मराठी साहित्याचे जेष्ठ समीक्षक तथा लेखक व कार्यशाळेचे मुख्य आयोजक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, समन्वयक ह.भ. प. प्रो. डॉ.अनिल मुंढे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मराठीचे ज्येष्ठ साहित्यकार भास्कर चंदनशिव यांचे दुःखद निधन झाल्याबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी पुढे बोलतांना डॉ. आसाराम लोमटे म्हणाले की, भाषेचे जतन खऱ्या अर्थाने अशिक्षित लोकच करतात कारण लोकसाहित्यामुळे भाषा जिवंत आहे. गडचिरोली चंद्रपूर धुळे नंदुरबार नांदेड या भागात झाडपट्टी रंगभूमीच्या माध्यमातून आजही मोठ्या प्रमाणामध्ये लोकनाट्य समाज शिक्षणाचे कार्य करीत आहे आणि आपापल्या बोलीभाषेचे जतन करीत आहे. कारण ज्या भाषेच्या बोली समृद्ध असतात ती भाषा समृद्ध असते. म्हणूनच अशा या समृद्ध मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा देऊन सन्मानित केले, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ मुंबई चे सदस्य प्रा.डॉ. सुरेश कदम यांनी आपल्या मनोगतातून म्हटले की, शब्दातून निर्माण झालेली मराठी भाषा आज अभिजात भाषा कशी बनली. त्यामध्ये विश्वकोशाचा सिंहाचा वाटा आहे असे ते म्हणाले. तसेच महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ मुंबईचे विद्याव्यासंगी सहाय्यक जगतानंद भटकर यांनी आपल्या मनोगतातून म्हटले की, भाषा ही भाषा नसते तर ती आपली भावना असते, काळाला व्यापून राहते ते अक्षर ज्या भाषेत असते ती भाषा अभिजात असते व जीवनाला स्पर्श करणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ज्यातून मिळते तो म्हणजे विश्वकोश होय, असेही ते म्हणाले. यांच्यासह ॲड.बी. व्ही. मोतीपवळे, सत्यनारायण भाऊ काळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी तर सूत्रसंचालन मराठी विभागाचे प्रो.डॉ. मारोती कसाब यांनी केले या कार्यशाळेसाठी राज्यभरातून शंभरहून अधिक प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!