विश्वकोशातले ज्ञान हे सर्वसमावेशक असते – प्रो.दिलीप चव्हाण
अहमदपूर, ( गोविंद काळे )
मान्यताप्राप्त संहिता या सत्तेचे प्रतीक असतात. त्यापैकीच एक मराठी विश्वकोश आहे.कारण मराठी विश्वकोशामधले ज्ञान सर्व समावेशक व विविध क्षेत्रांना स्पर्श करणारे असते, स्पष्ट प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलाचे संचालक प्रो. दिलीप चव्हाण यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयक्यूएसी अंतर्गत मराठी विभागाद्वारा आयोजित एक दिवशीय विश्वकोश नोंद लेखन कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक तथा मराठवाडा साहित्य परिषद अहमदपूर शाखेचे उपाध्यक्ष महेंद्र खंडागळे हे होते तर विचार मंचावर महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ मुंबई चे विद्याव्यासंगी सहायक जगतानंद भटकर, कार्यशाळेचे मुख्य संयोजक महाराष्ट्रातील मराठी साहित्याचे प्रसिद्ध समीक्षक तथा साहित्यकार प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, समन्वयक प्रो. डॉ.अनिल मुंढे, सहसमन्वयक प्रो. डॉ.मारोती कसाब आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यशाळेत एकूण चार सत्र घेण्यात आली. उद्घाटन सत्रासह दोन तांत्रिक सत्र घेण्यात आली. पहिले सत्राचा विषय ‘मराठी विश्वकोश नोंद व लेखन परंपरा ‘ हा होता.या सत्राच्या अध्यक्षस्थानी विमलाबाई देशमुख कन्या विद्यालय अहमदपूरच्या माजी मुख्याध्यापिका सुनंदा कुलकर्णी या होत्या तर प्रमुख वक्ते म्हणून जगतानंद भटकर यांनी मार्गदर्शन केले व सूत्रसंचालन कवयित्री वर्षा माळी लगडे यांनी केले. तसेच दुसरे सत्र ‘कृषी संस्कृती कोश ‘ या विषयावर घेण्यात आले या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगरचे माजी अधिष्ठाता तथा मराठी अभ्यास मंडळाचे मा. अध्यक्ष प्रो. डॉ. भारत हांडीबाग हे होते तर ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द.मा. माने हे प्रमुख वक्ते होते व सूत्रसंचालन प्रा. मनीषा झोल यांनी केले.
या कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. कांत जाधव, डॉ. विजय वारकड, डॉ. सुमित्रा तौर यांनी मनोगत व्यक्त केले. समारोप कार्यक्रमाप्रसंगी पुढे बोलतांना प्रो . चव्हाण म्हणाले की, जुने ज्ञान जतन करणे आणि नवीन संपादित करणे हे महत्त्वाचं कार्य विश्वकोशाच्या माध्यमातून केले जाते परंतु आजच्या काळामध्ये विश्वकोश हे आभासी पटलावर उपलब्ध व्हावेत असेही ते म्हणाले.
समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी महेंद्र खंडागळे म्हणाले की, भारतीय भाषा संस्कृतीचा श्वास आहे तर लोकसाहित्य आत्मा आहे. भाषेच्या माध्यमातून साहित्याला इतर ज्ञान शाखेची जोडणे आवश्यक आहे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाशी आपण जोडले गेले पाहिजे असेही ते म्हणाले.
समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.सीमा उप्पलवार यांनी केले तर आभार कार्यशाळेचे समन्वयक ह. भ. प. प्रो. डॉ. अनिल महाराज मुंढे यांनी मानले. यावेळी महाराष्ट्रातून एकशे तीस हून अधिक प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.
