भावी पिढीला कृषी संबंधी ‘ शब्दकोश’ देणे काळाची गरज – प्रा. द. मा.माने

0
भावी पिढीला कृषी संबंधी ' शब्दकोश' देणे काळाची गरज - प्रा. द. मा.माने

अहमदपूर, ( गोविंद काळे)
कृषी संस्कृतीले ‘शब्द’ हे अस्सल मराठी संस्कृती दर्शविणारे आहेत. गाव- गाड्यातली ‘संस्कृती’ टिकवून ठेवत असून सण, वार, उत्सवाच्या निमित्ताने आपल्या संस्कृतीच्या विचारांची देवाण- घेवाण केली जाते. पण, यातले हजारो नव्हे तर लक्षावधी शब्द काळाच्या ओघात लोप पावत आहेत. ते टिकवून ठेवण्यासाठी व भावी पिढीसाठी ही अनमोल शब्दसंपदा उपलब्ध करून देण्यासाठी ‘कृषी शब्दकोशा’ची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक प्रा.द.मा.माने यांनी केले.
प्रा. माने हे मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “नोंदलेखन कार्यशाळे”च्या दुसऱ्या सत्रात “कृषी संस्कृती कोश” या विषयावर संशोधनात्मक विवेचन करीत असताना आपले मौलिक संशोधनात्मक विचार मांडले.
यावेळी किसान पिठावर मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य डॉ. सुरेश कदम, विद्या व्यासंगी सहाय्यक डॉ. जगतानंद भटकर, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक आसाराम लोमटे, मसाप शाखा अहमदपूरचे अध्यक्ष सत्यनारायणभाऊ काळे, किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी. टी. शिंदे, प्राचार्य डॉ.वसंत बिरादार, उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी, डॉ. अनिल मुंढे आदिंची उपस्थिती होती.
या प्रसंगी पुढे बोलताना प्रा. द.मा. माने म्हणाले, की आज कृषीविषयक अनेक असे शब्द आहेत की त्यावर संशोधन होणे गरजेचे आहे. भाषाही वीस कोसावर बदलते असं म्हटलं जातं. आणि या बदलामुळेच कृषी विषयक अनेक शब्द त्या त्या परिसरातील संस्कृतीचे दर्शन घडविते.
तसेच या शब्दांच्या अर्थात विविधता दिसून येते. अशी अनेक कृषी विषयक शब्द आहेत की ज्याची क्रिया एकच आहे. मात्र नाव वेगळं आहे. उदाहरण जर द्यायचं झालं तर कुळवाला असलेली दांडी आणि तशीच कार्य करणारी नांगराची दांडीला “आळिस” हे नाव आहे. तसेच कुळवाला “रूमनं”असतं. त्याने कुळवावर दाब दिला जातो. तसेच नांगराला सुद्धा दाब देण्यासाठी एक लाकडी साधन असते त्याला मात्र “हाडूळ”हा शब्द आहे. म्हणजे क्रिया एकच मात्र शब्द वेगळे. असे अनेक उदाहरण देता येतील.असे अनेक शब्द आपल्याला कृषीमध्ये सापडतात.
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना प्रा. डॉ.भारत हंडिबाग यांनी आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे. तरीही अजून कृषी विषयक जे काही हावभावाचे शब्द आहेत, ते समजून घेणे गरजेचे आहे. ही भाषा जनावरांना कळते. आजही आपण जनावरांना पाणी पाजत असताना शिटी वाजवतो. तसेच बैल, म्हैस, शेळी, कुत्रा या सर्व प्राण्यास सावध करण्याचे अनेक हावभाव आहेत.
प्रारंभी परिचय ह.भ.प. डॉ.अनिल महाराज मुंढे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मनीषा झोल यांनी केले प्रा.डॉ. मारोती कसाब यांनी आभार व्यक्त केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!