नांदुरा (खुर्द्) येथील पूरग्रस्तांना सहकारमंत्र्यांच्या हस्ते मदत; ‘दुःखातून सावरण्यासाठी शासन तुमच्यासोबत’ – ना. बाबासाहेब पाटील
पोलीस फ्लॅश न्यूज अहमदपूर: ( गोविंद काळे): नांदुरा (बु.) येथील जेष्ठ नागरिक ज्ञानोबा जटुरे यांचे पुराच्या पाण्यात दुःखद निधन झाल्यानंतर, त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून तातडीने मदत मिळाली आहे. राज्याचे सहकार मंत्री तथा अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांच्या हस्ते, आज पूरआपत्तीचा धनादेश जटुरे कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आला.
मयत ज्ञानोबा जटुरे यांचे चिरंजीव राम जटुरे आणि लक्ष्मण जटुरे यांनी हा मदतनिधीचा धनादेश स्वीकारला. यावेळी बोलताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपली संवेदना व्यक्त केली.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची प्रतिक्रिया:
”ज्ञानोबा जटुरे यांचे पुराच्या पाण्यात झालेले निधन हे कुटुंबावर मोठे आघात करणारे आहे. या दुःखातून सावरण्यासाठी शासन तुमच्यासोबत खंबीरपणे उभे आहे. शासनाकडून मिळालेली ही मदत अत्यंत कमी असली तरी, जटुरे कुटुंबाला या कठीण परिस्थितीत आधार देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. पूरस्थितीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आणि पीडित कुटुंबांना त्वरित दिलासा देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे तहसीलदार उज्वला पागरकर तसेच दिलीपराव देशमुख शिवानंद हेगणे तात्या, शिवाजीराव देशमुख आणि अविनाश देशमुख हे उपस्थित होते. आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते मतदारसंघातील पीडित कुटुंबाला तातडीने मदत मिळाल्याने, कुटुंबाला भावनिक आणि आर्थिक आधार मिळाला आहे.
