राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमीचा शताब्दी उत्सव उत्साहात संपन्न
उदगीर (एल पी उगीले)
येथील विद्यावर्धिनी हायस्कूलच्या मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमीचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सकाळी ८ वाजता घोषाच्या तालावर तरुण व बालांचे संचलन सुरू झाले.संचलनात 525 स्वयंसेवक सहभागी झाले होते. शहराच्या मध्यवस्तीतून, बाजारपेठेतून हे ५० मिनिटांचे संचलन झाले. वातावरणामध्ये संघ शताब्दीचा प्रचंड उत्साह दिसून येत होता.
विजयादशमीच्या संपन्न झालेल्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर जिल्हा संघचालक रविंद्र जाधव, शहर संघचालक लक्ष्मीकांत रायवार, प्रमुख पाहुणे प्रसिद्ध सर्जन डाॅ.माधव चंबुले, प्रमुख वक्ते शिवशंभू विचार मंचाचे प्रमुख गोरक्षनाथ अबुज उपस्थित होते.
याप्रसंगी डॉक्टर माधव चंबुले म्हणाले की, संघाच्या कार्यक्रमाने मी भारावून गेलो. यापुढे मी संघ समजून घेण्याचा प्रयत्न करेन. प्रत्येकाने समाज व राष्ट्रासाठी कार्य केले पाहिजे. अशा भावना मांडल्या.
प्रमुख वक्ते देवगिरी प्रांताचे शिवशंभु विचार मंचाचे प्रमुख गोरक्षनाथ अबुज यांनी संघाच्या शताब्दी वर्षातील आगामी कार्यक्रमांचे स्वरूप आणि पंच परिवर्तन मुद्दे विस्तृत स्वरूपात मांडले.सामाजिक समरसता, एक गाव एक पाणवठा, एक स्मशानभूमी ,एक मंदिर ही संकल्पना सांगून पर्यावरणाकडे लक्ष देणे, त्या साठी प्लास्टिकचा वापर टाळणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
अधिकार व हक्क याप्रमाणे नागऱी कर्तव्यांकडे सुद्धा समाजाने डोळसपणे पाहून कृतिशील व्हावे. आपली कुटुंबव्यवस्था ही आपल्या समाजाचा आधार असून ती सुस्थितीत असणे गरजेचे आहे. संघ नेहमीच प्रत्यक्ष कृतीला महत्त्व देतो. संघावर वेळोवेळी खोटे आरोप, टीका,आघात झाले, परंतु संघाने आपल्या कृतीने आणि सामाजिक सद्भावाचे कार्य निरंतर सुरूच ठेवले आहे. आज शंभराव्या वर्षात पदार्पण करत असताना संघाबद्दल संपूर्ण समाजामध्ये विश्वासाचे आशास्थान निर्माण झाले आहे. आपल्या देशाला विश्वगुरू करण्यासाठी आपल्याला समाजात सुयोग्य परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे. असे संघ समजतो, आणि त्यासाठी संघ समाजासोबत येण्यास तयार आहे, किंवा समाज संघासोबत घेऊन कार्य करण्यास प्रतिबद्ध आहे. संघाचे काम माणसात परिवर्तन करून कर्तव्यदक्ष व जबाबदार नागरिक बनविणे हे संघ उद्दिष्ट असून नागरिकांनी संघ समजून घेऊन संघ कामात सहभाग व्हावे, असे वक्त्यांनी आवाहन केले. संघ आणि समाज एकरूप व्हावेत ,समरूप व्हावेत अशी संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांची इच्छा होती. असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर कार्यवाह कृष्णा बोईनवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन शहर संघचालक लक्ष्मीकांत रायवार यांनी केले.
कार्यक्रमास शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरीक व मातृशक्ती उपस्थित होते. अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.
