अहमदपूर दसरा महोत्सव उत्साहात संपन्न: ‘नयनरम्य आतिषबाजी’ आणि ‘अमृतसम प्रवचनाने’ नागरिक भारावले!

0
अहमदपूर दसरा महोत्सव उत्साहात संपन्न: 'नयनरम्य आतिषबाजी' आणि 'अमृतसम प्रवचनाने' नागरिक भारावले!

​अहमदपूर, ( गोविंद काळे ) सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने येथील महात्मा गांधी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आलेला दसरा महोत्सव यंदा मोठ्या उत्साहात, नयनरम्य आतिषबाजीसह आणि अमृतसम प्रवचनाच्या गजरात संपन्न झाला.
​यावेळी भक्ती स्थळाचे प्रमुख परमपूज्य आचार्य गुरुराज स्वामी यांनी दसरा प्रेमी नागरिकांना मार्गदर्शन केले.
​संस्कृती आणि संस्काराचे जतन करा – परमपूज्य आचार्य गुरुराज स्वामी
​प्रवचनादरम्यान परमपूज्य आचार्य गुरुराज स्वामी यांनी युवकांना मोलाचा संदेश दिला. ते म्हणाले की, “आजची तरुण पिढी दिशाहीन बनलेली असून, उज्वल व आदर्श भारत निर्माण करण्यासाठी येथील युवकांनी आपल्या देशाची संस्कृती आणि तेथील चालणाऱ्या संस्काराचे सर्व स्तरावर जतन करावे.” तसेच, त्यांनी धर्म, जात, पंथ विसरून माणसाने माणसाशी माणुसकीच्या नात्याने वागावे असे जाहीर आवाहन केले.
​याप्रसंगी दसरापीठावर भागवताचे गाढे अभ्यासक परमपूज्य अनंत महाराज बेलगावकर, वीर मठ संस्थानचे मठाधिपती परमपूज्य युवा संत राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज, सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
​परमपूज्य भागवताचार्य अनंत महाराज बेलगावकर यांनी शिवाजी महाराजांच्या चरित्राचे वाचन करून त्यांचा आदर्श घेण्याचा संदेश दिला.
​युवा संत परमपूज्य राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य यांनी “उठा जागे व्हा, धर्म रक्षणासाठी सज्ज व्हा” असे जाहीर आवाहन केले.
​शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला ५१ हजारांची मदत
​यंदा मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांप्रती बांधिलकी दर्शवत सार्वजनिक दसरा महोत्सव समितीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. समितीच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५१ हजार रुपयांचा धनादेश उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे यांना देण्यात आला. यावेळी दसरा महोत्सव समितीचे मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक सांगवीकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
​पारंपरिक मिरवणूक आणि शमी पूजन
​दसरा मैदानावर (महात्मा गांधी महाविद्यालय) येण्यापूर्वी शहराच्या प्रमुख मार्गावरून परमपूज्य राजराजेश्वरी देवी पालखी, परमपूज्य मडिवाळ शिवाचार्य महाराज पालखी, परमपूज्य देशीक स्वामी महाराज मेना, आणि परमपूज्य मलसिद्धप्पा महाराज पालखी या सर्व पालख्या वाजत गाजत आल्या.
​प्रारंभी, विजयादशमीच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये तहसीलदार उज्वलाताई पांगरकर आणि मानकरी बालाजी पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शमी पूजन करण्यात आले.
​प्रवचन आणि रावण दहनाच्या सोहळ्यानंतर नयनरम्य आतिषबाजीने अहमदपूरकर नागरिक अक्षरशः न्हाऊन निघाले.
​कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक सांगवीकर यांनी केले, सूत्रसंचालन राम तत्तापुरे यांनी केले, तर आभार संगम पाटील यांनी मानले.
​हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष साईनाथ पाटील, सचिव संगम पाटील, कोषाध्यक्ष संतोष निटुरे, जयराज तेलंग, अमर पाटील, सुरज भंडे पाटील यांच्यासह दसरा महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सोहळ्यास ओम भाऊ पुणे, शिवानंद हेंगणे, पोलीस निरीक्षक बिरप्पा भुसनूर यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!