अहमदपूर बसस्थानक नूतनीकरण: ‘बोगस’ कामाचा फेरआरंभ; प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ मौन आणि गैरव्यवहाराचा संशय गडद
अहमदपूर: ( गोविंद काळे): प्रवाशांच्या सोयीसाठी लाखो रुपयांच्या सरकारी निधीतून सुरू असलेल्या अहमदपूर बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, बातमी प्रसिद्ध होताच थांबलेले हे ‘बोगस’ काम आता पुन्हा एकदा ‘जैसे थे’ पद्धतीने सुरू झाले आहे. प्रशासकीय यंत्रणेने कंत्राटदाराशी ‘अर्थपूर्ण’ साटेलोटे करून जनतेच्या पैशांची खुलेआम लूट चालवल्याचा आणि भ्रष्टाचार करत असल्याचा स्पष्ट आरोप नागरिकांनी केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून ‘फाइव्ह स्टार’ दर्जा प्राप्त झालेल्या बारामती बसस्थानकासारखे काम होणे अपेक्षित असताना, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या तालुक्यात मात्र निकृष्ट काम सुरू असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बातमीचा प्रभाव शून्य, निकृष्ट कामाचा फेरआरंभ
पोलीस फ्लॅश न्यूजसह स्थानिक माध्यमांनी बसस्थानकाच्या नूतनीकरणात सुरू असलेल्या गंभीर त्रुटींवर प्रकाशझोत टाकल्यानंतर हे काम तात्पुरते थांबले होते. काँक्रिटीकरणासाठी योग्य खोदकाम न करता थातुरमातुर पिचिंग, निकृष्ट विटांचे बांधकाम आणि प्रवाशांना होणारा प्रचंड त्रास (धुळीचे साम्राज्य, नियोजनशून्य खोदकाम) या बाबी उघड झाल्या होत्या. मात्र, आता हेच काम कोणताही बदल न करता पुन्हा सुरू झाले आहे. काम निकृष्ट नव्हते, तर बातमी लागताच ते का थांबवले आणि आता पुन्हा त्याच पद्धतीने का सुरू केले? या प्रश्नांची उत्तरे विभागीय अभियंता (स्थापत्य) आणि एसटी महामंडळाचे अधिकारी यांच्याकडे नाहीत.
नियमांची उघड पायमल्ली आणि ‘अर्थपूर्ण’ मौन
बसस्थानकाच्या बांधकामात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मूलभूत नियमांची उघडपणे पायमल्ली केली जात आहे.
शास्त्रशुद्ध पद्धत दुर्लक्षित: काँक्रिटीकरणासाठी अगोदर किमान दीड फूट खोदकाम करून, त्यावर रोलरने व्हाईब्रेटर देऊन, मग बोल्डर आणि सिमेंटचा पहिला थर देणे आवश्यक आहे, परंतु हे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. व्हिब्रेटर रोलर वापरले गेले नाही.
स्टील स्ट्रक्चरचा अभाव: कामात स्टील स्ट्रक्चरचा (लोखंडी सांगाडा) वापर न करताच काम सुरू आहे.
वॉटरिंगकडे दुर्लक्ष: सिमेंट आणि बोल्डर मिक्स दाबल्यानंतर त्याचा वॉटरिंग (पाणी भरणी) कालावधी पूर्ण न करताच घाईघाईत दुसरा थर देण्याची तयारी सुरू आहे.
पारदर्शकतेला फाटा: नियमानुसार, हे काम ‘स्काडा सिस्टीम’ (SCADA System) नुसार इन-कॅमेरा करणे बंधनकारक असताना, तसे होताना दिसत नाही. कामाच्या ठिकाणी अंदाजपत्रकाचा (Estimate) बोर्डही लावलेला नाही, ज्यामुळे नागरिकांना कामाची माहिती मिळत नाही.
अंदाजपत्रक मागताच ‘माहिती अधिकारा’चा सल्ला
कामातील पारदर्शकतेचा बोजवारा उडालेला असताना, पोलीस फ्लॅश न्यूजच्या प्रतिनिधीने जेव्हा विभागीय अभियंता (स्थापत्य) कोकाटे आणि अभिजित भोसले यांच्याकडे कामाचे अंदाजपत्रक (Estimates) मागणी केली, तेव्हा या अधिकाऱ्यांनी “माहिती अधिकारात अर्ज करून अंदाजपत्रक मागा” असे उद्धट उत्तर देऊन जबाबदारी झटकली. जनतेच्या पैशातून सुरू असलेल्या सार्वजनिक कामाची माहिती देण्यास टाळाटाळ करणे, हे प्रशासनाचा कंत्राटदाराशी अर्थपूर्ण साटेलोटे असल्याचा स्पष्ट संकेत देते. तसेच कामाच्या ठिकाणी इंजिनियर आणि सुपरवायझरही हजर नाहीत.
भ्रष्टाचारामुळे भविष्यात धोका
बोगस कामामुळे बसस्थानकाच्या सिमेंट रस्त्यांना भविष्यात लगेचच खड्डे पडण्याची शक्यता आहे. शिरूर ताजबंद बसस्थानक अशाच निकृष्ट कामामुळे रोड लेवलच्या खाली गेले असून, तिथे पावसाळ्यात पाणी साचून तलावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अभियंता अभिजीत भोसले यांच्याशी संपर्फ साधला असता या अधिकाऱ्यांनी तर, “उस्मानाबाद, परभणी, लातूर जिल्ह्यात आम्ही अशीच कामे केली, कोणीही आम्हाला विचारले नाही, त्यामुळे काम असेच होईल,” अशा प्रकारचे उद्धट बोलणे सुरू केले आहे. ठेकेदार तर थेट “आम्ही सगळ्याची ओटी भरली आहे, तुम्ही कोठे ही जा आम्ही असेच काम करणार” असे आव्हान देत असल्यामुळे, मुंबई कार्यालयातूनच हे ठेके वाटले गेल्याच्या चर्चांना जोर आला आहे.
या गंभीर आरोपांवर विभाग नियंत्रक जानराव यांनी केवळ “काम योग्य होत आहे” असे बचावात्मक उत्तर दिले आहे. मात्र, बोगस काम नव्हते तर चौकशीचे पत्र का पाठवले, या मूलभूत प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नाही.
तातडीने उच्चस्तरीय चौकशीची मागणी
प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत असताना आणि सरकारी निधीचा उघडपणे अपव्यय होत असताना, अधिकाऱ्यांचे उडवाउडावीचे उत्तरे आणि दुर्लक्ष हे स्पष्टपणे भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे लक्षण आहे. शासनाच्या निधीचा योग्य वापर व्हावा यासाठी या संपूर्ण प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि दोषी कंत्राटदार तसेच ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अहमदपूरकरांनी पुन्हा एकदा जोरकसपणे केली आहे. शहरातील नागरिकांनी आपल्या बसस्थानकाचे काम कसे चालले आहे, हे पाहण्यासाठी एकदा फेरा मारून पहावे, असे आवाहन जागरूक नागरिकांनी केले आहे.
