शिरूर ताजबंद येथे श्री दुर्गा माता दौडची सांगता आणि भोसले परिवाराची आठ वर्षांची परंपरा कायम!
अहमदपूर ( गोविंद काळे ) तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे श्री दुर्गा माता दौडची उत्साहात सांगता झाली. भोसले परिवाराची ही आठ वर्षांची परंपरा यंदाही कायम राहिली. विजयादशमी निमित्त दौडच्या सांगतेसोबतच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
महाराजांच्या कीर्तनातून स्फूर्तीचा संदेश
या कार्यक्रमासाठी श्री ह.भ.प. रामभक्त वैजनाथ गुट्टे महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. महाराजांनी आपल्या कीर्तनातून प्रेरणादायक विचार मांडले. त्यांनी सांगितले की, या भारत देशात श्री राम प्रभू आणि छत्रपती शिवाजी महाराज असे दोनच देव होऊन गेले, आणि याच महान व्यक्तींची परंपरा शिरूर ताजबंद येथील भोसले परिवारांनी जपली आहे.
महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीच्या पारतंत्र्याच्या अंधाऱ्या काळाची आठवण करून दिली आणि सांगितले की, पुण्यश्लोक श्री जिजामातांच्या पोटी जन्माला आलेल्या महाराजांनी हिंदू समाजाला चेतना दिली.
जिजाऊंच्या उदात्त भावनांचा वारसा
नवरात्र आणि दुर्गामातेच्या पूजेचे महत्त्व सांगताना ह.भ.प. गुट्टे महाराज म्हणाले की, माता दुर्गा आपल्याला अमंगल गोष्टींचा संहार करण्याची आणि शस्त्र धारण करण्याची प्रेरणा देते. पुण्यश्लोक जिजामातांनीही प्रतिवर्षी नवरात्र बसवले असेल, पण त्यांनी तुळजाभवानी देवीकडे केवळ स्वतःच्या संसारासाठी किंवा भोसले वंशासाठी नव्हे, तर कन्याकुमारी ते कश्मीर पसरलेल्या भारतमातेचा उध्वस्त झालेला संसार दुरुस्त करण्यासाठी आशीर्वाद मागितले असतील. त्यांनी उपस्थितांना आवाहन केले की, आपणही पुण्यश्लोक जिजामाता आणि श्री शिवछत्रपतींचा तोच उदात्त भाव अंतःकरणात धारण करून, प्रत्येक वर्षी दुर्गामातेच्या पायाशी साऱ्या भारतमातेच्या संसाराला दुरुस्त करण्यासाठी आशीर्वाद मागण्याची प्रथा पत्करली पाहिजे. हा कार्यक्रम देशभक्ती, धर्मभक्ती आणि स्वातंत्रभक्ती बिंबवणारा होता, असे मत त्यांनी व्यक्त केले.
रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
श्री दुर्गामाता दौड आणि विजयादशमी निमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. आयोजक शिवानंद तूळशीराम भोसले यांनी यावेळी सांगितले की, “आपण केलेल्या रक्तदानाने एखाद्याचा प्राण वाचू शकतो.” हे शिबिर शिवानंद भैय्या तूळशीराम भोसले व त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. संकलन बँक शौर्य ब्लड सेंटर, अहमदपूर यांच्यावतीने एकूण १५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी जिल्हा परिषद सदस्य महेश बिलापट्टे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि सिद्धेश्वर औराद यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी मा. तुळशीरामजी भोसले, सुरेंद्र पाटील, बालाजी सारोळे, महेश बिलापट्टे, सत्यवान भोसले, ज्ञानोबा मंतलवाड, एन. टी. बिरादार, सिद्धेश्वर औरादे, बालाजी जवळगे, उद्धव भोसले, विठ्ठल गुरमे, राज जवळगे, केशव चामे, गोविंद गुरमे, संतोष जाजू, बबन मलफेद्वार, विष्णू शेठ जाजू, नामदेव श्रीमंगले, दीपक गुजरानी, विनायक खेडकर, जयवंत सगर, मनोज जाजू, रामकिशन पडोळे, शशिकांत पेद्येवाड, संजय सोनपुरे, दत्तात्रय कोंडलवाडे, तुकाराम मैत्रे, अविनाश राजे, प्रणव सारोळे, नागेश चामलवाड, शुभम आंचेवार, गजानन तेलगाणे, सुरेश जोशी, सोमनाथ कोरे, विनोद पाचंगे, ओमप्रकाश भोसले, विशाल भोसले, विक्रम भोसले आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
