प्रथेची परंपरा होते आणि परंपरेतून वारसा निर्माण होतो – प्राचार्य डॉ. अनिल सिंगारे
अहमदपूर ( गोविंद काळे )
ऐतिहासिक काळापासून जपलेला सांस्कृतिक वारसा हा प्रत्येक देशाचा महत्त्वाचा दस्तऐवज असतो. वारशातून संस्कृती निर्माण होते आणि संस्कृती जगण्याचे भान देते. समाजात नकळतपणे प्रथम प्रथा निर्माण होतात. प्रथांची परंपरा होते आणि परंपरेतून वारसा निर्माण होतो, असे प्रतिपादन इतिहासाचे गाढे अभ्यासक तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष प्राचार्य डॉ. अनिल सिंगारे यांनी केले.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक, कादंबरीकार तथा ज्येष्ठ पत्रकार प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथील महात्मा फुले महाविद्यालयाचा रौप्य महोत्सव साजरा होत असून, त्याचाच एक भाग म्हणून महात्मा फुले महाविद्यालयाच्या इंग्रजी व भूगोल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. अनिल सिंगारे बोलत होते.
‘ समकालीन भारतातील सांस्कृतिक वारसा : ओळख आणि आधुनिकता’ या विषयावर संपन्न झालेल्या एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री. माधवराव पाटील हे होते तर किसानपिठावर मंडळाचे माजी सचिव तथा ज्येष्ठ संचालक डी. आर. झोडगे गुरुजी, संयोजक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य तथा आयक्यूएसी समन्वयक डॉ. दुर्गादास चौधरी, चर्चासत्राचे समन्वयक इंग्रजी विभागप्रमुख डॉ. किरण गुट्टे, भूगोल विभागाचे प्रमुख तथा चर्चासत्राचे सहसमन्वयक डॉ. दिगंबर माने आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना डॉ. शिंगारे म्हणाले की, वारसा हा दोन प्रकारचा असतो. एक मृत स्वरूपाचा वारसा आणि दुसरा जिवंत वारसा. भारताचा सांस्कृतिक वारसा जगप्रसिद्ध असून ‘युनेस्को’ या जागतिक संस्थेने भारतातील ३८ वारसा स्थळांची नोंद घेतली आहे. सामान्य माणसाने मौखिक रूपाने सांस्कृतिक वारसा जतन केलेला आहे. मात्र भारताच्या स्थापत्य कलेबद्दल प्रचंड अनास्था असून मोठे मोठे गड किल्ले संवर्धित झाले पाहिजे. विहिरी, बारवा, गड , बुरुज आणि ऐतिहासिक वाडे जतन केले पाहिजेत. ऐतिहासिक वास्तू रुपातील सांस्कृतिक वारसा जपण्याच्या कार्यामध्ये सर्वसामान्य माणसाला सहभागी करून घेतले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या एकदिवसीय चर्चासत्रात सहभागी झालेल्या प्रतिनिधींपैकी प्रातिनिधिक स्वरूपात प्रा. डॉ. संजय बिबिनवरे, डॉ. शिवाजी देवनाळे, ,प्रा. शिवनंदा रोडगे , प्रो. डॉ. दिलीप सावंत, बालाजी शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प.डाॅ. अनिल महाराज मुंडे यांनी केले. तर शेवटी सर्वांचे आभार डॉ. दिगंबर माने यांनी मानले. या राष्ट्रीय चर्चासत्रात महाराष्ट्रासह देशभरातून ७५ पेक्षा अधिक संशोधक, शोधनिबंध लेखक, प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते.
