बहुभाषिकता आणि बहुसांस्कृतिकता हीच भारताची खरी ओळख – प्रोफेसर डॉ. डी. आर. बेद्रे
अहमदपूर, ( गोविंद काळे)
संपूर्ण जगाला आज अतिभौतिकवादाने आणि एकलकोंडेपणाने ग्रासले असून, जग आज भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहे. कारण भारतात कुठलाही कट्टरतावाद जोपासला जात नाही. बहुभाषिकता आणि बहुसांस्कृतिकता हीच भारताची खरी ओळख आहे, असे प्रतिपादन सागर ( मध्यप्रदेश) येथील डॉ. हरिसिंग गौर विद्यापीठाच्या यूजीसी एम. एम. टी. सी. सेंटरचे संचालक प्रोफेसर डॉ. डी. आर. बेद्रे यांनी केले.
येथील सुप्रसिध्द लेखक, समीक्षक, कादंबरीकार तथा ज्येष्ठ पत्रकार, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बेद्रे बोलत होते.
” समकालीन भारतातील सांस्कृतिक वारसा : ओळख आणि आधुनिकता” या विषयावर झालेल्या या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी. टी. शिंदे हे होते, तर प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून इतिहास परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अंबाजोगाई येथील खोलेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. शरद हेबाळकर, महाराष्ट्र एकीकरण समितीचे बीदर जिल्हा सचिव पृथ्वीराज अशोकराव पाटील एकंबेकर, प्राचार्य डॉ.वसंत बिरादार, उपप्राचार्य तथा आयक्यूएसी समन्वयक डॉ. दुर्गादास चौधरी, समन्वयक डॉ. किरण गुट्टे, सहसमन्वयक डाॅ.दिगंबर माने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना डॉ. बेद्रे म्हणाले की, भारताचा बहुसांस्कृतिक वारसा जतन करणे हे एक आव्हान असून, आपली सांस्कृतिक वारसास्थळे जपणे हे केवळ सरकारचे काम नसून, जनतेनेही त्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. संस्कृती ही मूर्त आणि अमूर्त स्वरूपात जिवंत असते. मात्र ती जपण्याचे काम समाजाचे असते असेही ते म्हणाले.
यावेळी उद्घाटक प्राचार्य डॉ. शरद हेबाळकर म्हणाले की, सर्व ज्ञानाचे स्त्रोत भारताबाहेर शोधण्याऐवजी भारतातच ज्ञान स्त्रोतांचा शोध घेतला पाहिजे. आमचा इतिहास, आमची संस्कृती आम्हीच शोधली पाहिजे. आपल्या सांस्कृतिक वारशाचे महत्त्व ओळखले पाहिजे. त्यासाठी संस्कृत, पर्शियन आणि मोडी भाषांचा अभ्यास आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चर्चासत्राचे समन्वयक इंग्रजी विभागप्रमुख डॉ. किरण गुट्टे यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. आपल्या मनोगतातून त्यांनी महाविद्यालयाची आणि संस्थेची ओळख करून दिली. तसेच रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी विभागाच्या प्रा. मनीषा झोल यांनी केले. पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी करून दिला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते चर्चासत्राच्या शोधनिबंध संग्रहाचे तसेच मराठी, इंग्रजी आणि अर्थशास्त्र या विषयाच्या भित्तीपत्रकांचे प्रकाशनही करण्यात आले. या चर्चासत्रात पंचाहत्तर पेक्षा अधिक शोधनिबंध लेखक, प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी सहभागी झाले होते.
