​बालाघाट तंत्रनिकेतनमध्ये नूतन विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात; ‘प्रत्येक कामात आई-वडिलांना ठेवा समोर’ – गणेश हाके

0
​बालाघाट तंत्रनिकेतनमध्ये नूतन विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात; 'प्रत्येक कामात आई-वडिलांना ठेवा समोर' - गणेश हाके

​अहमदपूर ( गोविंद काळे )
​महाविद्यालयीन जीवन जगत असताना विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच कला, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांत भरारी घ्यावी आणि जीवनातील कोणतेही कार्य करताना आई-वडिलांचा चेहरा समोर ठेवावा, ज्यामुळे विद्यार्थीदशेमध्ये कोणताही वाईट निर्णय घेण्याची हिंमत होणार नाही, असे मत संस्था अध्यक्ष गणेश हाके यांनी व्यक्त केले. बालाघाट तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वतीने आयोजित नूतन विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
​हाके यांनी देशातील इंजिनिअरिंग क्षेत्रातील सद्यस्थितीवर प्रकाश टाकत, आपल्या देशामध्ये 1000 लोकसंख्येमागे केवळ एकच इंजिनिअर कार्यरत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षण घेऊन देशपातळीवर आपल्या कार्याचा ठसा उमटवावा, असे आवाहन केले. तसेच, गुरुंविषयी निष्ठा व श्रद्धा ठेवण्याचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
​’इंटरनेटचा वापर शैक्षणिक कामासाठी करा’ – तांदळे सर
​या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले तांदळे सर यांनीही विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, इंजिनिअर म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे, तर सर्व क्षेत्रातील ज्ञान घेऊन परिपूर्ण भारतीय नागरिक तयार व्हावा, या दृष्टीने विद्यार्थ्यांनी परिश्रम करणे आवश्यक आहे. तसेच, इंटरनेट आणि मोबाईलचा वापर मनोरंजनासाठी न करता शैक्षणिक कामासाठी करावा आणि त्यातून ज्ञान आत्मसात करावे, असे मत तांदळे सरांनी व्यक्त केले.
​कार्यक्रमादरम्यान विविध विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, तर नूतन विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
​या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तांदळे सर यांच्यासह संचालक कुलदीप हाके, प्राचार्य बोडके सर, तसेच व्यासपीठावर प्राचार्य संग्राम कोपनर आणि प्राचार्य मदन आरदवाड उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!