नगरपालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादीने उभारली गुढी, काँग्रेस पाहते मागेपुढे! इतर जन जमवतात जोडी जोडी!!

नगरपालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादीने उभारली गुढी, काँग्रेस पाहते मागेपुढे! इतर जन जमवतात जोडी जोडी!!

उदगीर (एल.पी.उगीले) : नगरपालिका निवडणूक जवळ येऊ लागल्या, कोरोना विषाणूचा संसर्गच्या पार्श्वभूमीवर निवडणुका पाच सहा महिने पुढे जाण्याची शक्यता असली तरीही, या निवडणुकीत कोणत्याही पद्धतीने आपल्याला सत्ता हस्तगत केलीच पाहिजे. अशा निर्धाराने राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागली आहे. उदगीर विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा राज्यमंत्री संजय बनसोडे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर जरी निवडून आले असले तरीही विद्यमान स्थितीमध्ये ते महाआघाडीचे महत्वाचे घटक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने सुरू केलेली ही तयारी त्यांना माहित आहे की नाही? हे कळायला मार्ग नाही. काँग्रेस पक्षाचे नेते मात्र घाई न करता महाआघाडी जरी नाही झाली तर किमान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी कायम राहील. अशा विश्वासावर असल्यामुळे अजून तरी काँग्रेसने स्वतंत्रपणे हालचाल केल्याचे दिसून येत नाही. सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करायला सुरुवात केली असून रुसवे-फुगवे दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र टोकाला गेलेली गटबाजी आणि प्रचंड मनभेद हे त्यांना एकत्र येऊ देतील की नाही? हा संशोधनाचा विषय आहे. नगरपालिका निवडणुकीची पूर्वतयारी म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष गजानन सातारकर यांच्या पुढाकारातून शहरातील प्रमुख पदाधिकारी ,कार्यकर्ते आणि संभाव्य इच्छुक उमेदवार अशा 100 हून अधिक जणांची बैठक घेऊन त्यांची मते जाणून घेतली आहेत. तसेच शहरातील नागरी समस्यांच्या संदर्भात माहिती घेतली आहे. अनेक प्रभागात कुठे रस्ते नाहीत, कुठे नाल्या बरोबर नाहीत, कुठे पाण्याची समस्या तर कुठे विजेचा प्रश्न! अशा अनुषंगाने कार्यकर्त्यांनी आपले मनोगत या बैठकीत मांडली.

नगरपालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादीने उभारली गुढी, काँग्रेस पाहते मागेपुढे! इतर जन जमवतात जोडी जोडी!!

कार्यकर्त्यांचा उत्साह दांडगा होता. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस उदगीर विधानसभा अध्यक्ष प्रवीण भोळे, शहराध्यक्ष समीर शेख, कार्याध्यक्ष गजानन सताळकर यांच्यासह शंकर मुक्कावर, अजीम दायमी, मुसा पठाण, माधव उदगीरकर, अजय शेटकार, दिपाली औटे, सुस्मिता माने, डाॅ. भाग्यश्री घाळे, ज्योती स्वामी, शहनाज शेख, राहुल सोनवणे, सय्यद मोईन, साजिद कुरेशी, फिरोज देशमुख, राजकुमार गंडारे, विजय भालेराव, आतिख शेख, शफी हाश्मी, इम्तियाज शेख इत्यादी मान्यवर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम राहणार असला तरीही आपण आपल्या कामाला सुरुवात केली पाहिजे. नागरिकांच्या विकासाचे प्रश्न सोडवल्यानंतर नागरिक निश्चितपणे आपल्या  विचाराला महत्त्व देतील, असा विश्वास या प्रसंगी गजानन सातारकर यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी शहरातील विविध लाभार्थ्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा. गोरगरिबांचे प्रश्न सोडवावेत. असेही आवाहन याप्रसंगी करण्यात आले. काँग्रेस पक्षाच्या वतीने अद्याप कोणतीही हालचाल जरी दिसत नसली तरी काँग्रेसचे वन मॅन आर्मी राजेश्वर निटूरे हे कोणत्याही क्षणी आपले वर्चस्व सिद्ध करू शकतात. असेही बोलले जात आहे. एकंदरीत काय तर हळूहळू राजकीय वातावरण तापू लागले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही!

About The Author