भारतीय ज्ञानपरंपरा ही विस्तृत व सर्वसमावेशक — डॉ. विठ्ठल गोरे
उदगीर (एल पी उगीले) भारतीय ज्ञानपरंपरा ही हजारो वर्षांपासून आपल्या देशात अस्तित्वात असून वेद, उपनिषदे आणि शास्त्रीय ग्रंथ यांचा तिच्यावर भक्कम आधार आहे. त्यामुळेच ही परंपरा विस्तृत आणि सर्वसमावेशक आहे, असे मत हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर येथील इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. विठ्ठल गोरे यांनी व्यक्त केले. येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्या वतीने भारतीय ज्ञानपरंपरा या विषयावर व्याख्यान आणि भित्तिपत्रकाचे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के होते. व्यासपीठावर इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. संजीव सूर्यवंशी, प्रा. बालाजीप्रसाद घाळे आणि प्रा. संजय बिबीनवरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. संजीव सूर्यवंशी यांनी भित्तिपत्रक निर्मितीचे शैक्षणिक महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की भित्तिपत्रक हे अल्पावधीत अधिकाधिक लोकांपर्यंत ज्ञान पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम आहे आणि त्यातून समाजात जाणीवजागृती निर्माण करण्यास मदत होते. भारतीय ज्ञानपरंपरा ही आपली खरी ओळख असून प्राचीन काळात नालंदा आणि तक्षशिला यांसारखी विद्यापीठे जगातील सर्वात जुनी विद्यापीठे म्हणून ओळखली जातात. डॉ. गोरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की भारतातील ज्ञानपरंपरा ही मौखिक, लिखित आणि पारंपारिक दृष्ट्या समृद्ध होती. यामध्ये तत्त्वज्ञान, अध्यात्म, आयुर्वेद, खगोलशास्त्र, गणित, योग आणि कला यांसारख्या विविध शास्त्रांचा समावेश होता. आज ही परंपरा काही प्रमाणात लोप पावत असली तरी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून ती पुन्हा रुजविण्याचा प्रयत्न शासनस्तरावर सुरू आहे. या परंपरेचा सार्थ अभिमान बाळगून विद्यार्थी आणि शिक्षकांनी तिच्या पुनरुज्जीवनासाठी कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी विद्यार्थ्यांमध्ये ऐकण्याची परंपरा पुन्हा रुजविण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी सांगितले की भारत हा ज्ञानात रममान होणारा देश आहे आणि आपली ज्ञानपरंपरा व गुरुपरंपरा जगात सर्वोच्च आहे. ऋषींनी जीवन कसे जगावे आणि ते तेजस्वी कसे बनवावे याचे ज्ञान दिले आहे. जीवनात कळणेपेक्षा वळणे अधिक महत्त्वाचे आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. बीए, बीकॉम आणि बीएस्सी वर्गातील विद्यार्थ्यांनी भित्तिपत्रकांचे सादरीकरण केले. बीएस्सी प्रथम वर्षातील विद्यार्थिनी सय्यदा निशांत फातिमा हिने प्रथम क्रमांक, उदगीरे इफत निदा हिने द्वितीय क्रमांक आणि बीए प्रथम वर्षातील नुसरत शेख हिने तृतीय क्रमांक मिळविला. भित्तिपत्रकांचे परीक्षण प्रा. संजय बिबीनवरे आणि प्रा. बालाजीप्रसाद घाळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यदा सानिया यांनी तर आभार प्रदर्शन शुभदा स्वामी यांनी केले.
