अमुर्ताला मूर्त रूपात विशद करणारी साहित्यकृती म्हणजे दृष्टांत आगर होय – हनुमंत म्हेत्रे.

0
अमुर्ताला मूर्त रूपात विशद करणारी साहित्यकृती म्हणजे दृष्टांत आगर होय - हनुमंत म्हेत्रे.

उदगीर (एल पी उगिले)
समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम म्हणजे कीर्तन होय. कीर्तनाच्या माध्यमातून सामान्यापासून ते असामान्यापर्यंतच्या सर्व जीवावर परिणाम साधता येऊ शकतो. कुठलाही विषय श्रोत्यांच्या अंतकरणात उतरवण्यासाठी विनोद व दृष्टांताचा आधार घ्यावा लागतो. विविध दृष्टांताच्या आधारे अमूर्त विषयाला मूर्त रूपात विषद करणारी साहित्यकृती म्हणजे दृष्टांत होय, असे मत प्रसिद्ध कवी तथा सहाय्यक कृषी अधिकारी हनुमंत म्हेत्रे यांनी व्यक्त केले.
शासकीय दूध डेरीच्या सभागृहात संपन्न झालेल्या चला कवितेच्या बनात या उपक्रमांतर्गत च्या 346 व्या वाचक संवादामध्ये हनुमंत म्हेत्रे यांनी कै.ह.प. बाबासाहेब इंगळे महाराज लिखित दृष्टांत आगर या साहित्यकृतीवर संवाद साधला. पुढे बोलताना ते म्हणाले की, जीवनात खेळकरपणा व विनोद बुद्धी असेल आणि विनोद बुद्धीला दृष्टांताची साथ लाभली तर जगणे आनंददाई व सुखमय बनते. प्रबोधनकारांना एखादा सिद्धांत श्रोत्यांच्या गळी उतरवायचा असेल तर दृष्टांताची गरज असते. ते सतत पौराणिक व परंपरागत कथांच्या माध्यमातून उपदेश करताना अभंग, ओव्यांचे प्रमाण देतात. कोणताही सिद्धांत सांगावयाचा झाल्यास त्यास दृष्टांत द्यावे लागतात.
सदरच्या ग्रंथात पौराणिक, सामाजिक, काल्पनिक व अलंकारिक भाषेत रसभरीत अनेक दृष्टांत व त्यांचे तात्पर्य ही दिलेले आहेत. असे सांगत म्हेत्रे यांनी प्रत्यक्षात काही ओव्या गाऊन दाखवून त्याची प्रभावीपणे मांडणी केली.
अध्यक्षीय समारोपात मोहन महाराज निडवंचे म्हणाले की, अनेक मौल्यवान व तेवढेच आनंददायी दृष्टांत या ग्रंथात दिलेले असून त्याची अत्यंत प्रभावी मांडणी म्हेत्रे यांनी केलेली आहे. जीवन आनंदी घडवायचे असेल तर अशा वाचक संवाद चा खूप मोठा फायदा होऊ शकतो. तो सर्वांनी करून घ्यावा.
अत्यंत प्रभावशाली ठरलेल्या या वाचक संवादाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. माधव कांबळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. राजपाल पाटील यांनी करून दिला तर आभार प्रा.सुरेश शिंदे, बेंबरेकर यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!