हावगीस्वामीच्या कु.श्रद्धा नागरगोजे यांना अभिजात काव्य पाठांतर स्पर्धेत प्रथम पारितोषिक

0
हावगीस्वामीच्या कु.श्रद्धा नागरगोजे यांना अभिजात काव्य पाठांतर स्पर्धेत प्रथम पारितोषिक

उदगीर (प्रतिनिधी)
मराठी भाषा विभाग महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई ,मुक्ताई प्रतिष्ठान,देगलूर तसेच अभिनव भारत शिक्षण संस्था, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे आयोजित गोदागौरव मराठी साहित्य संमेलनानिमित्त शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अभिजात काव्य पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये साहित्य कलेबद्दलची अभिरुची वाढावी, त्यातून कलावंत साहित्यिक घडावेत या हेतूने ही स्पर्धा घेण्यात आली.
आयोजकाच्या वतीने मध्ययुगीन व आधुनिक काळातील काही निवडक कवींची यादी देण्यात आली होती. त्यातून विद्यार्थ्यांना पाच कविता निवडून तोंडपाठ सादरीकरणाचा एक व्हिडिओ बनवून यूट्यूब लिंकद्वारे पाठवायचे होते.
यात महाविद्यालयातील कु. श्रद्धा नागरगोजे व कु.शुभांगी बिरादार यांनी अनुक्रमे मध्ययुगीन काळातील संत तुकाराम व आधुनिक मार्क्सवादी कवी नारायण सुर्वे यांच्या पाच कविता व्हिडिओ करून पाठविले होते.
सदरील स्पर्धेत श्री हावगीस्वामी महाविद्यालयात बी.ए.तृतीय वर्षात शिकत असलेली कु.श्रद्धा नागरगोजे यांनी संत तुकाराम महाराज यांचे आता तरी पुढे हाची उपदेश।, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल।,क्षणो क्षणा हाची करावा विचार, संसाराचे अंगी अवघीच व्यसने व नको नको रे मना गुंतू मायाजाळी l या पाच अभंगावर व्हिडिओ बनविला होता. यात त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले. अकराशे रुपये रोख रक्कम व प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप होते.
साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू
डॉ.अशोक महाजन यांच्या हस्ते सदरील विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.यावेळी अनेक प्रकारचे साहित्यिक मान्यवर मंचावर व समोर उपस्थित होते. संमेलनाच्या समारोपाला सुरुवातीलाच मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेतील बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल हा अभंग कु.श्रद्धा यांनी सादर करून रसिक श्रोत्यांना अंतर्मुख केले.
कु.श्रद्धा नागरगोजे यांनी आजपर्यंत पंचवीस राज्यस्तरीय भजन स्पर्धेत सहभाग नोंदवून सात वेळा प्रथम, पाच वेळा द्वितीय तर नऊ वेळा उत्तेजनार्थ पारितोषिक त्यांनी प्राप्त केले. त्यांचा एस.एम. म्युझिक आयकॉन हा युट्युब चॅनेल देखील आहे.या चॅनलवर त्यांचे अनेक अभंग ऐकायला मिळतील. वारकरी संप्रदायाच्या परंपरेत श्रद्धा यांची जडणघड झाली. त्यामुळे संप्रदायाचा अध्यात्मिक वारसा बालपणापासूनच त्यांना मिळाला. तसेच विविध शाळा महाविद्यालयातील स्पर्धेबरोबरच अनेक मोठमोठ्या कार्यक्रमात त्यांनी स्वागतगीत सादर केले होते.
आपल्या या यशाचे श्रेय कु.श्रद्धा नागरगोजे यांनी आजोबा धोंडीराम किशनराव नागरगोजे, वडील बालाजी, आई श्रीदेवी, बहीण श्रुतिका व आपल्या सर्व गुरुजनांना दिले. या स्पर्धेसाठी सहभागी विद्यार्थ्यांना डॉ.म.ई.तंगावार यांचे मार्गदर्शन लाभले.
अभिजात काव्य पाठांतर स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्राप्त केल्याबद्दल भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. गुणवंतराव पाटील हैबतपूरकर, सचिव उमेश पाटील देवणीकर, उपाध्यक्ष शिवकुमार हसरगुंडे, संगमेश्वर जिरगे, सहसचिव प्रभूराज कप्पीकेरे, कोषाध्यक्ष शंकरप्पा हरकरे, संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, प्राचार्य डॉ.ए.ए.काळगापुरे,उपप्राचार्य डॉ.एन.जी.एमेकर, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, साहित्यिक, कलावंत व विद्यार्थ्यां कडून त्यांचे कौतुक होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!