बाजार समितीच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी नोंदणी करावी – शिवाजीराव हुडे
उदगीर (एल पी उगीले)
उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत कार्यरत असणाऱ्या उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांची होणारी सोयाबीन खरेदी विक्रीच्या संदर्भातली अडचण विचारात घेऊन, सोयाबीन खरेदी केंद्र आपल्याकडे मिळावे. अशी मागणी पणन महामंडळाकडे केली होती. लोक कल्याणकारी योजनेचा भाग म्हणून पणन महामंडळाकडून उदगीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकऱ्यांच्या सोयीसाठी म्हणून सोयाबीन खरेदी केंद्राला मंजुरी दिली आहे.
मंजुरीचे अधिकृत पत्र कृषी उत्पन्न बाजार समितीला प्राप्त झाले असून त्या पत्रानुसार सोयाबीन खरेदी केंद्र उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सुरू झाले आहे. शेतकऱ्यांनी तातडीने आपल्या सोयाबीनच्या नोंदी करून घ्याव्यात. जेणेकरून शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समितीला सक्रिय होऊन काम करता येईल. या नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येऊन नोंदणी करावी. असे आवाहन उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे यांनी केले आहे.
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती ही सतत शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, हमाल, मापाडी या सर्वच घटकांचे हित विचारात घेऊन कार्य करत असल्यामुळे लोककल्याणकारी योजनांना मंजुरी मिळवून आणण्यासाठी बाजार समिती सतत प्रयत्न करत असल्याची ही शिवाजीराव हुडे, प्रभारी सचिव प्रदीप पाटील यांनी याप्रसंगी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, या दृष्टीने आपण सतत शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहत असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ही सभापती शिवाजीराव हुडे यांनी सांगितले आहे.
