धैर्यशालिनी काळगे यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाचा मंत्र दिला – रघुनाथ सुडे
उदगीर (एल.पी.उगिले) महात्मा गांधीजींनी खेड्याकडे चला, असा मूलमंत्र दिला होता. मात्र प्रत्यक्षात जे चित्र दिसत होते, ते प्रत्येक जण शहरात जात होते. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून विद्या दानाचे काम करणाऱ्या धैर्यशालीनी काळगे या विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून नागलगाव पंचक्रोशी मध्ये लोकप्रिय झाल्या, कारण शिक्षण देत असताना विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून काम करणारे आणि विद्यार्थी हा केवळ गुणवंत नाही तर तो यशवंतही झाला पाहिजे. त्यासाठी त्याच्यामध्ये आत्मविश्वास आणि कष्ट करण्याची जिद्द निर्माण करण्याची क्षमता उत्कृष्ट शिक्षकांमध्ये असते, ती क्षमता नागलगावच्या विद्यार्थ्यांनी धैर्यशालिनी काळगे यांच्यामध्ये पाहिली.
ग्रामीण भाग असून देखील या गावातील रुक्मिणी माता सुडे कन्या विद्यालयात अत्यंत दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देऊन, अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणाऱ्या श्रीमती धैर्यशालिनी काळगे या सेवानिवृत्त होत आहेत, या गोष्टीचे दुःख विद्यार्थ्यांना आणि पालकांना निश्चित वाटत असेल. असे विचार संस्थाचालक रघुनाथ सुडे यांनी व्यक्त केले.
ते श्रीमती धैर्यशालिनी काळगे यांच्या सेवापुर्ती निमित्त आयोजित सत्कार कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अशोक बंडपा काळगे हे होते. या प्रसंगी श्रीमती धैर्यशालिनी काळगे त्यांच्या वर्गमैत्रिणी श्रीमती अर्चना मिरकले, मनोरमा जाधव, शिवकांता जाधव, आशा पाटील यांच्यासह चवळे बळीराम, काशिनाथ स्वामी इत्यादी मान्यवरही उपस्थित होते. त्यांनीही समायोजित मनोगत व्यक्त केले.
पुढे बोलताना रघुनाथ सुडे यांनी स्पष्ट केले की, श्रीमती काळगे धैर्यशालीने या शांत, सुशोभावी, संयमी आणि विद्यार्थ्यांना दैवत समजून शिक्षण देणाऱ्या शिक्षिका आहेत. या विद्यालयाला लाभल्या हे या परिसराचे भाग्य समजतो. विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासासोबतच व्यक्तिमत्व विकास कसा होईल? याकडे जास्तीत जास्त त्यांनी लक्ष दिले. त्यामुळे त्यांच्या एकूण कामगिरीमुळे संस्थेचे नाव देखील उज्वल झाले. ही अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी अभ्यास इतका मर्यादित न ठेवता त्यानी क्रीडा, स्काऊट, सांस्कृतिक कार्यक्रम, वाद विवाद स्पर्धा यासोबतच स्पर्धात्मक जगामध्ये जात असताना वाकचातुर्य कशा पद्धतीने विकसित करता येईल? यासाठी देखील त्यांनी अनेक उपक्रम राबवले. नियत वयोमानानुसार तब्बल 32 वर्षाच्या सेवेनंतर त्या सेवानिवृत्त होत आहेत, असेही सांगितले.
सत्काराला उत्तर देताना श्रीमती धैर्यशालिनी काळगे यांनी स्पष्ट केले की, रुक्मिणी माता सुडे कन्या विद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये समरस होऊन त्यांचा विकास करण्यामध्ये मला आनंद आला. त्यांच्या आनंदामध्ये मी माझा आनंद शोधत होते. या संस्थेने मला पूर्ण अधिकार देऊन विद्यार्थी घडवण्याचे काम माझ्यावर सोपवले होते. ते मी आनंदाने पूर्ण केले. आता शासकीय नियमानुसार जरी मी सेवानिवृत्त होत असले तरी, कधीही विद्यार्थ्यांच्या हितासाठी काही काम सांगितले तर मी सदैव तत्पर तयार राहीन असे अभिवचनही त्यांनी याप्रसंगी दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार बिरादार यांनी तर आभार डॉ. राजेश्वर काळगे यांनी मानले.
